राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड यांनी घेतली राज ठाकरेंची भेट
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा निरोप घेऊन मंत्री जितेंद्र आव्हाड कृष्णकुंजवर पोहोचल्याची जोरदार चर्चा सुरु झाली. मात्र, यावर आव्हाड यांनी हे स्पष्टीकरण दिलेय.
मुंबई : आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीची व्युहरचना आतापासून अनेक राजकीय पक्ष आखत आहेत. त्यामुळे राजकीय नेत्यांच्या भेटीगाठींवर भर दिसून येत आहे. राज्यातील राजकारणात नवीन समीकरण जोडण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. त्याचाच एक भाग म्हणून राष्ट्रवादी आणि मनसेच्या जवळीकडे पाहिले जात आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा निरोप घेऊन मंत्री जितेंद्र आव्हाड कृष्णकुंजवर पोहोचल्याची जोरदार चर्चा सुरु झाली. मात्र, यावर आव्हाड यांनी स्पष्टीकरण दिलेय.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांची भेट कृष्णकुंजवर घेतली. परंतु, ही भेट राजकीय नव्हती. ती वैयक्तिक कारणांसाठी होती, अशी माहिती आव्हाड यांनी मीडियाला दिली. आव्हाड यांनी राज ठाकरेंची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. दरम्यान, शरद पवार यांचा निरोप घेऊन आव्हाड राज ठाकरेंच्या भेटीला गेल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात होते. मात्र, आव्हाड यांनी स्पष्टीकरण दिल्याने यावर पडदा पडला तरी चर्चेला जोरदार रंगत आलेय.
राज ठाकरे यांच्याकडे मी माझ्या वैयक्तिक कामासाठी गेलो होतो. त्यांच्याबरोबर खूप वेळ गप्पा मारली. राज हे अभ्यासू आहेत. त्यांच्याबरोबर बोलताना अनेक विषयांची माहिती झाली. भेटीमागे कोणताच राजकीय हेतू नव्हता. भविष्यात महाराष्ट्रासमोर असलेल्या अडचणी, नुकताच झालेल्या नाट्यसंमेलनातील भाषणाबाबत चांगली चर्चा झाली. त्यामुळे भेटीमागचा वेगळा अर्थ काढला जाऊ नये, असेही ते म्हणाले.
दरम्यान, महाराष्ट्रात महाआघाडीची चाचपणी करण्यासाठी पवार यांनी आव्हाडांना कृष्णकुंजवर पाठवले, असा राजकीय निरिक्षकांचा अंदाज आहे. राज ठाकरेंनी शरद पवारांची पुण्यात घेतलेली जाहीर मुलाखत चांगलीच गाजली होती. त्यानंतर दोन्ही नेते दोन-तीन वेळा एकत्र आले. त्यामुळे या भेटीची चर्चा रंगली आहे.