कपिल राऊत, ठाणे :  वाधवान प्रकरणात सरकारनं कारवाई केली आहे, भाजपनं त्याचं राजकारण करू नये. त्यापेक्षा डॉक्टरांच्या जीवावर उठणारा केंद्र सरकारचा पीपीई किट आणि मास्कबाबतचा आदेश रद्द करायला लावा, असा पलटवार राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बँक घोटाळ्यातील आरोपी वाधवान लॉकडाऊन असताना महाबळेश्वरला गेल्याप्रकरणी भाजपनं राज्य सरकारवर टीका करत वाधवान यांची शरद पवारांशी जवळीक असल्याचा आरोप केला होता. आव्हाड यांनी यावरून भाजपवर टीकेची झोड उठवली.


कोरोना व्हायरसशी लढा देताना डॉक्टर, नर्स आणि आरोग्य सेवकांना लागणारे पीपीई किट आणि मास्क केंद्र सरकारच्या परवानगीशिवाय घेऊ नका, असे आदेश राज्य सरकारला केंद्राकडून देण्यात आले आहेत. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे डॉक्टरांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. केंद्र सरकारचं हे परिपत्रक रद्द करण्याची मागणी भाजपनं पत्रकार परिषद घेऊन करावी, असा टोला आव्हाड यांनी हाणला.


वाधवान प्रकरणात संबंधित अधिकाऱ्याला सक्तिच्या रजेवर पाठवलं असताना भाजपनं त्याचं राजकारण करू नये, असं आव्हाड म्हणाले.


केंद्र सरकारनं पत्र पाठवून पीपीई किट खरेदी करण्यास मनाई केली. पीपीई किट घ्यायचे नाहीत, मास्क घ्यायचे नाहीत, वैद्यकीय साहित्य घ्यायचे नाही. लोक मरत आहेत आणि पीपीई किट नाही म्हणून लोक संतप्त होत आहेत. पण राजकारण करायचे नाही म्हणून आम्ही अजून तोंड बंद ठेवले होते. पण केंद्र सरकारच्या या धोरणावर भाष्य न करणाऱ्या भाजपनं भलत्याच मुद्यावर राजकारण सुरु केल्याची टीका आव्हाड यांनी केली.


आम्हाला आमचे डॉक्टर, चतुर्थ श्रेणी कर्मचारी यांची काळजी आहे. आम्ही सगळा खजिना वापरू आणि त्यासाठी देऊ. पण केंद्रानं आडकाठी आणून महाराष्ट्राला अडचणीत आणले आहे. केंद्र सरकारनं परिपत्रक मागे घ्यावे म्हणून भाजप नेते पत्रकार परिषद घेतील का? असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.


कुठला एक अधिकारी पत्र देतो आणि वाधवानची माणसं महाबळेश्वरला जातात. हे त्या अधिकाऱ्याने त्याच्या मनाने केले आहे. पण भाजपने या सगळ्याचा रोख शरद पवारांकडे वळवला. शरद पवारांचे नाव घेतल्याशिवाय आपले दुकान चालणार नाही हे भाजपच्या नेतृत्वाला माहीत आहे. गेली ५० वर्षे भाजपवाले हेच करत आहेत, अशी टीका आव्हाडांनी केली.


 



या प्रकरणात पवारांचा काय संबंध? पत्र आल्यानंतर गृहमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांशी संपर्क साधला आणि रात्री १२ वाजता त्या अधिकाऱ्याला सक्तिच्या रजेवर पाठवले. हे सरकार सक्षम आहे. उद्धव ठाकरे आमचे मुख्यमंत्री आहेत आणि शरद पवार आमचे भिष्माचार्य आहेत. कुणाचे फालतू लाड आम्ही करत नाही, अशी प्रतिक्रिया त्यांनी वाधवान प्रकरणावर दिली.