`माफ करा साहेब...यावेळी तुमचं ऐकणार नाही`; आव्हाडांचं भावनिक ट्विट
महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळ्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर ईडीने गुन्हा दाखल केला आहे.
मुंबई : महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळ्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर ईडीने गुन्हा दाखल केला आहे. यानंतर शरद पवार आज दुपारी २ वाजता ईडीच्या कार्यालयात जाणार आहेत. पण ईडी कार्यालयात जाण्याआधी शरद पवारांनी कार्यकर्त्यांना शांततेचं आवाहन केलं आहे. ईडी कार्यालयाच्या परिसरात कार्यकर्त्यांनी गर्दी करू नये, तसंच अनुचित प्रकार घडू नये आणि शांतता राखावी, असं पवारांनी कार्यकर्त्यांना सांगितलं आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी मात्र पवारांच्या या आवाहनानंतर भावनिक ट्विट केलं आहे. माफ करा साहेब ह्या वेळेस पहिल्यांदा आम्ही तुमचे नाही ऐकणार.. मी जातोय माझ्या विठ्ठलासाठी, मी जातोय पवार साहेबांसाठी..!! असं ट्विट जितेंद्र आव्हाड यांनी केलं आहे.
ईडी कार्यालयाबाहेर कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून त्या परिसरातला पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. तर मुंबईतल्या राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांची गर्दी व्हायला सुरुवात झाली आहे.
दरम्यान शरद पवार यांना ईडी कार्यालयात प्रवेश मिळणार नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. शरद पवारांच्या ईडी ऑफिस भेटीच्या पार्श्वभूमीवर परिसरात जमावबंदीचे आदेश देण्यात आले आहेत. पवारांच्या ईडी कार्यालय भेटीकडे गृह मंत्रालयाची नजर आहे. पवारांच्या ईडी भेटीसंदर्भात दिल्लीत बैठक झाली. या बैठकीत परिस्थिती चिघळली तर सीआरपीएफ जवानांना तैनात राहण्याचे आदेश देण्यात आलेत. तसंच पोलीस बंदोबस्त वाढवण्याच्या सूचनाही देण्यात आल्यात.