JNU Protest : राष्ट्रवादीचे मंत्री जितेंद्र आव्हाडांविरोधात गुन्हा
राष्ट्रवादीचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुंबई : राष्ट्रवादीचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आव्हाडांविरोधाल भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी तक्रार दाखल केली होती. दिल्लीत जेएनयू विद्यापीठात विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ मुंबईत गेट वे ऑफ इंडिया येथे आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनात विद्यार्थ्यांसह विविध क्षेत्रातील नामांकित व्यक्तींनी सहभाग घेतला होता. यात राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड हेही सहभागी झाले होते. जितेंद्र आव्हाड यांच्या सहभागावर भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी आक्षेप घेत तक्रार दाखल केली होती. याप्रकरणी कुलाबा पोलीस ठाण्यात आव्हाडांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दिल्लीत जवाहरलाल नेहरु विद्यापीठात (जेएनयू) शांतता बैठक सुरू असताना तोंडांला मास्क लावून काही गुंडांनी विद्यापीठात घुसून विद्यार्थ्यांवर हल्ला केला होता. या हल्ल्यात विद्यार्थ्यांसह प्राध्यापकही जखमी झालेत. गुंडांनी विद्यार्थी वसतिगृहासह साहित्याचेही नुकसान केले होते. या घटनेनंतर देशातील इतर शहरांमध्ये याविरोधात जोरदार निषेध व्यक्त करण्यात येत आहे. याचाच एकभाग म्हणून मुंबईत मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया येथे आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनात विद्यार्थी, कलाकारांसह राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड हे सहभागी झाले होते. यावर किरीट सोमय्या यांनी आक्षेप घेतला आहे.
मुबईतील आंदोलनात ‘काश्मीर को चाहिए आझादी’ अशा घोषणा देण्यात आल्याचा आरोप भाजपने केला होता. किरीट सोमय्या यांनीही यावर आक्षेप घेतला. किरीट सोमय्या यांनी याप्रकरणी कुलाबा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. ठाकरे सरकारमधील मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली अवैध आणि देशविरोधी घोषणा देण्यात आल्या. हे आंदोलन करण्यासाठी पोलिसांनी परवानगी दिली नव्हती. तरीही हे आंदोलन करण्यात आले. याची पोलिसांनी दखल घ्यावी आणि कारवाई करण्यात यावी, अशी मागणी सोमय्या यांनी तक्रारीत केली होती. त्यानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला.