काळाघोडा फेस्टिवलसाठी प्रायोजक मिळेना
21 व्या काळाघोडा फेस्टिवलसाठी क्राऊडफंडिंग मोहिम
मुंबई : काळाघोडा फेस्टिवल हा भारतातील सर्वात जुना स्ट्रीट फेस्टिवल म्हणून ओळखला जातो. हा फेस्टिवल कला, थिएटर आणि सिनेमा यांच्यासाठी ओळखला जातो. काळाघोडा फेस्टिवलचं यंदाचं 21 वं वर्ष असून प्रायोजक मिळत नसल्यामुळे क्राऊडफंडिंग मोहिम सुरू करण्यात आली आहे. काळाघोडा फेस्टिवल आंतरराष्ट्रीय स्तरावरही लोकप्रिय आहे. दिवसेंदिवस या फेस्टिवलमध्ये सहभागी होणाऱ्यांच्या संख्येत वाढच होत आहे.
20 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच आयोजकांनी, काळाघोडा फेस्टिवलच्या असोसिएशनने देशाच्या कानाकोपऱ्यातील लोकांना फंड जमा करण्यासाठी आवाहन केले आहे. फेस्टिवलकरता प्रायोजक न मिळाल्यामुळे काळाघोडा आयोजकांनी क्राऊडफंडिंगचा पर्याय स्वीकारला आहे.
मुंबईचा सांस्कृतिक वारसा जपणाऱ्या या महोत्सवाचा वारसा पुढे चालवण्यासाठी सगळ्यांनी पाठिंबा देण्याचे आवाहन असोसिएशनने केले आहे. 'यावर्षी देशातील व्यवसायाचे वातावरण धूसर होत चालले आहे. देशातील इतर सर्व उपक्रमांप्रमाणेच आपल्यालाही कठीण परिस्थितीला तोंड द्यावे लागत आहे. यातूनच क्राऊडफंडिंगचा पर्याय समोर आला आहे.'
'देशभरातील कलाप्रेमींना या महोत्सवात सहभागी होण्यासाठी आमंत्रित केलं जातं. भव्य आणि प्रभावशाली अशी त्यांची कला येथे मांडण्याची संधी दिली जाते. हा महोत्सव लोकांसाठी सुरू झालाय आणि लोकांनीच त्याला पुढे नेलं आहे. यामुळे आता आम्ही लोकांकडूनच हा वारसा पुढे नेण्यासाठी पाठिंब्याची आशा करत आहोत, असं देखील आयोजकांनी सांगितलं आहे.'