स्मशानभूमीत साजरा केला वाढदिवस, 100 हून अधिक लोकांना निमंत्रण; केक कापून केली बिर्याणी पार्टी
Birthday Party : गौतम मोरे नावाच्या व्यक्तीच्या 54 वा वाढदिवस स्मशानात साजरा करण्यात आलाय
सध्या वाढदिवस (Birthday Party) साजरा करण्याच्या अनोख्या पद्धती पाहायला मिळत आहेत. अनेक जण भररस्तात केक (Cake) कापून फटाके फोडत वाढदिवस साजरा केला जातोय. तर कुठे तलवारीने केक कापत वाढदिवस साजरा केला जातोय. याचे व्हिडीओ अनेकदा सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. पण कल्याणमध्ये (Kalyan) एका अवलियाने साजरा केलेला वाढदिवस चर्चेचा विषय ठरलाय. या पठ्ठ्याने चक्क स्मशानात वाढदिवस साजरा केलाय. वाढदिवसासोबत जंगी पार्टीदेखील देण्यात आलीय.
आपल्या वाढदिवसाची पार्टी लोक रेस्टॉरंटमध्ये पार्टी देतात. अनेकजण मोठी हॉटेल्स बुक करतात. काही लोक तर मेट्रोतही बर्थडे पार्टी करत असल्याचे समोर आलय. मात्र या व्यक्तीने वाढदिवसाची पार्टी स्मशानभूमीत ठेवली होती. कल्याण शहरात राहणारे गौतम रतन मोरे यांनी त्यांच्या वाढदिवसाची पार्टी आयोजित केली होती. स्मशानभूमीत या बर्थडे पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. आज तकच्या वृत्तानुसार, मोरे यांनी 19 नोव्हेंबर रोजी मोहने स्मशानभूमीत वाढदिवसाची पार्टी दिली. स्मशानभूमीतच वाढदिवसाचा केक कापण्यात आला. याशिवाय बिर्याणी हा पार्टीचा मेन्यू होता. बर्थडे पार्टीमध्ये एक मेळावा होता. हा यासाठी शंभरहून अधिक लोकांचा होता. अनेकांनी आपल्या कुटुंबीयांसह या वाढदिवसाला हजेरी लावली होती.
बुधवारी सोशल मीडियावर या पार्टीचा एक व्हिडिओ समोर आलाय ज्यामध्ये लोक वाढदिवस साजरा करताना दिसत आहेत. काळी जादू आणि अंधश्रद्धा विरोधात प्रचार करणाऱ्या विख्यात सामाजिक कार्यकर्त्या दिवंगत सिंधुताई सपकाळ आणि दिवंगत नरेंद्र दाभोलकर यांच्याकडून आपल्याला याची प्रेरणा मिळाल्याचे मोरे यांनी यावेळी माध्यमांसोबत बोलताना सांगितले. भूत म्हणजे काहीही नसतो, हा संदेश लोकांना द्यायचा आहे, असेही मोरे म्हणाले.
मोरे यांनी सांगितले की, वाढदिवसाच्या सोहळ्याला 40 महिला आणि लहान मुलांसह 100 हून अधिक पाहुणे उपस्थित होते. या सर्वांनी स्मशानभूमीतच मोरे यांचा वाढदिवस साजरा केला. केक कापून वाढदिवस साजरा करतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.