धक्कादायक! गप्पा मारत बसणाऱ्या कुटुंबावर संतप्त शेजाऱ्यांकडून जीवघेणा हल्ला, घर जाळण्याचा प्रयत्न
Kalyan News : कल्याण पुन्हा हादरलं! शेजाऱ्यांचा वाद विकोपास. रागाच्या भरात केला जीवघेणा हल्ला. पाहा आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी.
आतिष भोईर, झी मीडिया, कल्याण : (Kalyan News) आणखी एका धक्कादायक घटनेनं कल्याण हादरलं आहे. कल्याणमधील चिकणघर परिसरात रात्रीच्या वेळी घराबाहेर गप्पा मारत बसणाऱ्या शेजारच्या कुटुंब संतप्त शेजाऱ्यांनी जीवघेणा हल्ला केला आहे. आधी घरावर रॉकेल टाकून घर जाळण्याचा प्रयत्न आणि त्यानंतर कुऱ्हाडीने वार केल्यानं या घटनेनं सर्वांनाच हादरा बसला आहे. या हल्ल्यात चार जण जखमी झाले असून दोन लहान मुलांचा ही समावेश आहे.
चेतन मांडळे असं जीवघेणा हल्ला करणाऱ्या आरोपीचे नाव असून, कल्याणच्या रुक्मिणीबाई रुग्णालयामध्ये प्राथमिक उपचार करून दोघांना सायन रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं. दरम्यान या हल्ल्यानंतर आरोपीला अटक करण्यात आली असून, महात्मा फुले पोलीस स्थानकातील तपास यंत्रणांनी पुढील तपास सुरू करण्यात आला आहे.
कल्याण पोलिसांकडून गुन्हेगारांना कारवाईचा दणका
कल्याण डोंबिवलीमध्ये मागील काही दिवसांपासून गुन्हेगारी वाढत असल्याने कल्याण डोंबिवली मधील पोलीस अॅक्शन मोडवर आले आहेत. रात्री अपरात्री रस्त्यावर कानाकोपऱ्यात टवाळखोरपणा करणाऱ्या, नशा करणाऱ्या तब्बल 170 जणांवर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला असून, त्यांना पोलिसी खाक्या दाखवत टवाळखोर नशेखोराना उठा बशा काढायला लावल्या. नागरिकांनी देखील या कारवाईचे स्वागत केलं असून सातत्याने ही कारवाई सुरु ठेवावी अशी मागणी केली आहे