कल्याण : अनेक वर्षांपासून प्रलंबित असणार पत्रीपुलाचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. सोमवारपासून पत्रीपूल प्रवासाकरीता खुला करण्यात येणार आहे. त्यामुळे नेहमी वाहतूक कोंडीचा सामना करत असलेल्या कल्याण-डोंबिवलीकरांसाठी दिलासा देणारी बातमी आहे. कल्याण डोंबिवलीला जोडणाऱा रेल्वे समांतर रस्त्याचे काम 2016 मध्ये पालिका प्रशासनाकडून सुरु करण्यात आले होते. मात्र पत्रीपूलाचे काम पूर्ण होण्यासाठी तब्बल 4 वर्षांचा कालावधी लागला. अखेर दिर्घ प्रतिक्षेनंतर पत्रीपूल सोमवारपासून सुरू होणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान, पालिका अधिकाऱ्यांसह आयुक्त डॉ विजय सूर्यवंशी यांनी रस्त्याची पाहणी केली .यावेळी या रस्त्याचे काम पूर्ण झाले असून पत्रीपुलाजवळ असलेला विजेचा ट्रान्सफार्मर आणि विजेचे पोल, दोन झाडे या रस्त्यात बाधित होत असल्याचे लक्षात आले. त्यामुळे पोल, झाडे आणि ट्रान्सफार्मर हटवून पुढील आठवड्यात सोमवार पासून पूल वाहतुकीसाठी खुला केला जाणार असल्याचे आयुक्तांनी सांगितले. 


यावेळी शहरातील कोपर पूल, वडवली पुलाचे काम देखील अंतिम टप्प्यात असून लवकरच हे सर्व रस्ते वाहतुकीसाठी सुरु करता येणार असल्याची माहिती देखील यावेळी आयुक्तांनी दिली. त्यामुळे आता कल्याण डोंबिवलीला जोडणाऱ्या पत्रीपूल लवकरच वाहतुकीसाठी खुला होणार आहे. 



पत्रीपुलाचं काम काही वर्षापासून रखडल्यामुळे वाहतुकीचे फार मोठी कोंडी होत आहे. या वाहतुकीच्या कोंडीला कल्याणपासून डोंबिवलीपर्यंतचे नागरीक कंटाळले आहेत. अनेकांचे काही तास या कोंडीतच जात असल्याने, नागरिकांमध्ये याविषयी संताप आहे. मात्र अनेक वर्षांपासून रखडलेला हा प्रश्न मार्गी लागला आहे.