कल्याणच्या स्कायवॉकवर भिकारी आणि फेरिवाल्यांचं अतिक्रमण
कल्याण स्कायवॉकची परिस्थिती अत्यंत दयनीय झाली आहे.
श्वेता वाळंज, झी मीडिया, कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या हद्दीत साकारण्यात आलेल्या स्कायवॉकची परिस्थिती अत्यंत दयनीय झाली आहे. रेल्वे स्टेशनशी जोडलेल्या या स्कायवॉकवरुन रोज हजारो प्रवासी जात-येत असतात. कल्याण पश्चिमेला एकूण चार ठिकाणाहून हा स्कायवॉक पादचाऱ्यांसाठी आहे. त्यापैकी एक रस्ता हा गुरूदेव हॉटेलजवळून आहे. पण या मार्गावर सर्वत्र फेरिवाल्यांचा वावर असल्याने येथे प्रवाशांना चालण्यासाठी अनेक अडचणींना सामना करावा लागतो. उपनगरीय रेल्वे मर्गावरील कल्याण हे अतिशय महत्त्वाचे रेल्वे स्टेशन आहे. जंक्शन असल्यामुळे येथे अनेक लांब पल्ल्याच्या गाड्या ही थांबतात.
कल्याण तहसील कार्यालयाजवळून स्कायवॉकचा दुसरामार्ग सुरू होतो. याठिकाणी भिकाऱ्यांचे वास्तव्य आहे. त्यामुळे स्कायवॉकवर अस्वच्छतेचे चित्र दिसून येते. स्कायवॉकवर त्यांनी आपले संसार थाटले आहेत. शिवाय याआधी अनेक वेळा स्कायवॉकला आग लागण्याच्या घटना देखील समोर आल्या आहेत.
एमएमआरडीएकडून साकारण्यात आलेल्या या स्कायवॉकचे हस्तांतरण कल्याण-डोबिंवली महापालिकेकडे करण्यात आले आहे. त्यामुळे स्कायवॉकच्या सुरक्षेची आणि स्वच्छतेची जबाबदारी पूर्णपणे महापालिकेची आहे. परंतु महापालिका याबाबत गंभीर नसल्याचं चित्र आहे. शिवाय देहविक्रीचा व्यवसाय करणाऱ्या महिला देखील या ठिकाणी उभ्य़ा असतात. त्यामुळे याकडे एकंदरीत संपूर्ण प्रशासनाचं दुर्लक्ष असल्याची खंत प्रवाशी व्यक्त करत आहेत.
एल्फिस्टन घटनेनंतर मुंबई उच्च न्यायालयाने रेल्वे स्टेशन परिसरापासून किमान १५० मीटर दूर फेरिवाल्यांचे पूनर्वसन करण्याचे आदेश पालिकेला दिले होते. पण कल्याण स्थानकाच्या बाबतीत अशी कोणतीच कारवाई होत नाही.
काही दिवसांपूर्वी भिवंडीचे खासदार कपिल पाटील यांनी कल्याणच्या स्कायवॉकचा पहाणी दौरा केला होता. या दौऱ्यावेळी त्यांनी महापालिकेच्या संबधित अधिकाऱ्यांना चांगलेच सुनावले. महापालिकेकडून कारवाई होते. पण ती कारवाई थातुरमातुर स्वरूपाची असते.
अशा कारवाईमुळे याठिकाणी फेरिवाल्यांचा बोजवारा उडालेला दिसत आहे. फेरिवाल्यांच्या वाढत्या संख्येमुळे स्कायवॉकवर वस्तू खरेदी करणाऱ्यांची एकच गर्दी असते. याच गर्दीत महिलांच्या छेडछाडीचे प्रकार देखील समोर येतात. त्यामुळे कल्याण स्कायवॉक नक्की कोणासाठी? हा प्रश्न याठिकाणी उपस्थित होत आहे.