आतिश भोईर, झी २४ तास, कल्याण : बलात्काराच्या खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देऊन खंडणी वसूल करणाऱ्या तरूणीला कल्याणमध्ये रंगेहात अटक करण्यात आली आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेचे नगरसेवक दया गायकवाड यांच्यासोबत हा प्रकार घडला आहे. गंभीर बाब म्हणजे दोन वर्षांपूर्वी याच तरूणीने गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. मात्र त्यावेळी त्यांची निर्दोष मुक्तता झाली होती. आता पुन्हा या तरूणीने हा प्रकार सुरू केला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

खंडणी वसूल करण्यासाठी ही तरूणी नगरसेवकाच्या कार्यालयात आली. प्रथम तिने पैशांचं बंडल बॅगेत टाकलं. त्याआधी तिने सीसीटीव्ही बंद करायचा प्रयत्न केला. मात्र माझं कोण काय बिघडवणार असं बोलत तिने पैशांचं बंडल सीसीटीव्हीत दाखवलं. मात्र या सगळ्या प्रकाराबाबत गायकवाड यांनी पोलिसांना आधीच माहिती दिली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचला होता. ही तरूणी पैशांची बंडलं घेऊन पळून जाण्याच्या तयारीत असतानाच पोलीस तिथे दाखल झाले आणि तरूणीला अटक केली.


बलात्कार हा खरोखर अमानूष गंभीर प्रकार आहे. समाजातल्या बलात्कारी प्रवृत्तींना संपवणं गरजेचं आहेच, पण बलात्काराची धमकी देऊन खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची प्रवृत्तीही तेवढीच विकृत म्हणावी लागेल.