कमला मिल कंपाऊंडमध्ये आगीचे तांडव, १५ जणांचा होरपळून मृत्यू
मुंबईत वरळी परिसरातील कमला मिल कंपाऊंटमध्ये भीषण आग लागली. रात्री मोजोस टेरेस पबला भीषण आग लागली. या आगीत १५ जणांचा होरपळून मृत्यू झाला.
मुंबई : कमला मिल कंपाऊंटमध्ये भीषण आग लागली. रात्री मोजोस टेरेस पबला भीषण आग लागली. या आगीत १५ जणांचा होरपळून मृत्यू झाला. तर २० जण जखमी झालेत. जखमींना केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान, या आगीचे कारण अस्पष्ट आहे.
पबमध्ये १५० लोक अडकलेत
एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, पबमध्ये १५० च्या आसपास लोक होते. त्यामुळे या आगीत ५० जणांचा मृत्यू झाल्याचा अंदाज आहे.दरम्यान, या आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आलेय.
ट्रेड हाऊस इमारतीच्या टेरेसवर असलेल्या मोजोस पबमध्ये रात्री उशिरा आग लागली. कमला मिल कंपाऊंड परिसरात रेस्टॉरेंट्स आणि पब आहेत. मोजोस पबमध्ये पार्टी सुरू असताना हा प्रकार घडल्याचे सांगण्यात येत आहे. मृत्यूमुखींमध्ये पबमध्ये आलेल्या तरुण-तरुणींचा समावेश आहे.
भीषण आग आणि धुराचे लोट हवेत
आग इतकी भीषण होती की टेरेसवर बांधण्यात आलेलं बांबू आणि प्लास्टिकचं संपूर्ण छप्पर जळून खाक झाले. आगीचे लोट कमला मिल कंपाऊंडच्या बाहेरूनही स्पष्ट दिसत होते. धुराचे लोट हवेत पसरले होते. सिलिंडरचे स्फोट झाल्याने आग आणखीच भडकली.
रात्री साडेबारा वाजताच्या सुमारास आग
रात्री साडेबारा वाजताच्या सुमारास लागलेली आग अग्नीशमन दलाच्या साडेतीन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर विझविण्यात यश मिळाले. दरम्यान, घटनास्थळी मुंबई महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी भेट देऊन पाहणी केली. संपूर्ण आग आज सकाळी ६.२३ वाजता विझवण्यात आल्याची माहिती देण्यात आली.
जखमींना केईएम रुग्णालयात दाखल
दरम्यान, जखमींना केईएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून जखमींचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. केईएममध्ये ६ जणांना दाखल करण्यात आलेत. यात दोन जण गंभीर आहेत. तर भाटीया रुग्णालय १३ जखमी उपचार घेत आहेत. तसेच सायन रुग्णालयात दोघांना दाखल करण्यात आलेत.