कमला मिल दुर्घटनेनंतर आयुक्तांनी उचलली कडक पावलं
कमला मिल कंपाऊंडमधील भीषण आगीनंतर आयुक्तांची कडक कारवाई.
मुंबई : कमला मिल कंपाऊंडमधील भीषण आगीनंतर आयुक्तांची कडक कारवाई.
मोजो आणि वन अबोव्ह या रेस्टोपब्सना लागलेल्या भीषण आगीनंतर अखेर मुंबई महापालिका आयुक्तांनी कडक पावलं उचललीत. आयुक्त अजोय मेहता यांनी गुरूवारी पालिका मुख्यालयात सहाय्यक आयुक्त आणि अग्निशमन अधिका-यांची महत्त्वाची बैठक घेतली. या बैठकीनंतर त्यांनी एक परिपत्रक काढलंय. त्यानुसार सहाय्यक आयुक्त आणि अग्निशमन दलातील अधिका-यांना त्यांनी महत्वाचे आदेश दिलेत. हॉटेल मालक तसंच खानपान सेवा पुरवणाऱ्या व्यावसायिकांनी अग्निसुरक्षा उपाययोजनांची पूर्तता करण्यासाठी 30 दिवसांची मुदत देण्यात आलीय.
त्यानंतर अधिका-यांनी आपापल्या विभागात स्वतः तपासणी करावी. ज्याठिकाणी उपाययोजनेमध्ये त्रुटी आढळतील त्या संबंधित हॉटेल मालक आणि खानपान सेवा पुरवणाऱ्यांवर महाराष्ट्र अग्नि प्रतिबंधक कायद्यान्वयचे कारवाई करावी. संबंधितांचा वीज आणि पाणीपुरवठा बंद करावा, अशा कडक सूचना देण्यात आल्यायत. एवढंच नव्हे तर महाराष्ट्र झोपडपट्टी कायद्यांतर्गत धोकादायक व्यवसाय बंद करावेत, अशी ताकीदही देण्यात आलीय.
त्याचप्रमाणे नितेश राणे यांनी देखील या प्रकरणावर ट्विट केले आहे. ट्विटमध्ये असे म्हटले आहे की, कमला मिल कपांऊंडमधील आगीच्या मुद्यावरून लक्ष विचलित होत आहे. त्यामुळे राज्यात नागरिकांनी हा मुद्दा धरून ठेवावा. कारण यामुळे बीएमसी अधिकारी आणि कमला मिलमधील रेस्टाँरंटचे मालक सुखावले आहे.
पालिकेच्या परिपत्रकात काय लिहिलंय
अग्निशमन दलाचं ना हरकत प्रमाणपत्र नसल्याबद्दल 72 तासांची नोटीस देऊनही त्याची दखल न घेणा-या लाऊंज बार आणि हुक्का पार्लर सील करण्याचा निर्णय ठाणे पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी घेतलाय. आयुक्तांनी जवळपास साडेचारशे आस्थापने तातडीने सील करण्याचे आदेश संबंधित अधिका-यांना दिलेत. पाचशे चौरस फूटापेक्षा जास्त क्षेत्रफळ असलेली हॉटेल्स, लाऊंज बार आणि हुक्का पार्लर्सनी अग्निशमन दलाचं ना हरकत प्रमाणपत्र सादर केलेलं नाही किंवा आग प्रतिबंधक उपाययोजनांबाबत तरतुदींचे पालन केलेले नाही अशा सर्व आस्थापनांना 26 सप्टेंबरला सात दिवसांची नोटीस बजावण्यात आली होती.
एकाही आस्थापनेने कागदपत्र सादर न केल्यामुळे पालिका आयुक्तांच्या आदेशानुसार संबंधित आस्थापनांना 30 डिसेंबरला 72 तासांत कागदपत्रं सादर करण्याची नोटीस बजावली होती. मात्र या नोटीशीनंतरही कागदपत्रांची पूर्तता न करणा-या आणि आग प्रतिबंधक उपाययोजना न करणा-या आस्थापनांना तात्काळ सील करण्याचे आदेश पालिका आयुक्तांनी दिलेत. मुंबईतल्या कमला मिल अग्नितांडवानंतर ठाण्यात ही धडक कारवाई करण्यात येतेय