कमला मिल : राहुल गांधी आणि आदित्य ठाकरेंनी व्यक्त केलं दु:खं!
कमला मिल कपाऊंडमध्ये गुरुवारी रात्री झालेल्या भीषण अग्नितांडवाप्रकरणी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे.
मुंबई : कमला मिल कपाऊंडमध्ये गुरुवारी रात्री झालेल्या भीषण अग्नितांडवाप्रकरणी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे.
कमला मिल कम्पाउंडमधील वन अबव आणि मोजेस हॉटेल यांना लागलेल्या आगीत १४ जणांचा मृत्यू झाला असून १२ जण जखमी आहेत. तर अनेक राजकीय नेत्यांनी या घटनेवर दु:ख व्यक्त केलं आहे. कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी आणि शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी यासंदर्भात ट्विट केले आहे.
काय म्हणाले राहुल गांधी?
कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनीही ट्विट करून या घटनेबाबत हळहळ व्यक्त केली आहे. राहुल गांधी यांनी मराठीमध्ये हे ट्विट करत दु:ख व्यक्त केलं. ते म्हणाले की, ‘मुंबई मधील कमला मिल्स कंपाऊंडमध्ये भीषण आग लागून अनेकांना आपले प्राण गमवावे लागले. ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे.पीडितांच्या कुटुंबियांच्या दुःखात मी सहभागी आहे. या घटनेची त्वरीत चौकशी करून दोषींना कठोर शिक्षा झाली पाहिजे’.
आदित्य ठाकरे यांचेही ट्विट
तसेच, शिवसेनेच्या युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनीही ट्विट करून या घटनेबद्दल दु:ख व्यक्त केलंय. ते म्हणाले की, ‘ही फारच धक्कादायक आणि दुखद घटना आहे. जखमींच्या आणि मरण पावलेल्यांसाठी मी प्रार्थना करतो. तसेच मी महापालिकेच्या आयुक्तांशीही, आमदार सुनील शिंदे यांच्याशी बोललो आहे. याप्रकरणी चौकशी करण्याचेही मी बोललो आहे’.
मालकासह तिघांवर गुन्हा दाखल
या प्रकरणी मुंबई पोलिसांनी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केलाय. ना म जोशी मार्ग पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात असा असून, ऱ्हतेश संघवी, जिगर संघवी, अभिजित मानका आणि इतर या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. सदोष मनुष्यवध, बेजबाबदारपणा, निष्काळजीपणा, जिवितास कारणीभूत, अग्नी विरोधक यंत्रणा यानुसार गुन्हे दाखल करण्यात आलेत.
चार तासानंतर आग आटोक्यात
या तिघांपैकी दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून लवकर त्यांना अटक दाखवली जाईल असं वरीष्ठ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलंय. ही आग इतकी भीषण होती की यांत टेरेसवर बांधण्यात आलेले बांबू आणि प्लास्टिकचं छप्पर जळून खाक झालंय. तब्बल चार तासांच्या प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आलंय. या आगीत जखमी झालेल्यांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.