मुंबई : अभिनेत्री कंगना रानौत हिने मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या दाव्यात आज शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांचे वकील बाजू मांडणार आहेत. या खटल्याच्या निमित्तान कंगना आणि राऊतांचा पुन्हा सामना रंगत आहे. काल झालेल्या सुनावणीत संजय राऊत यांनी कंगनाला धडा शिकवण्याचे वक्तव्य केल्याचे तिच्या वकिलांनी न्यायालयाला सांगितले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वृत्तवाहिनीला दिलेल्या या मुलाखतीची ध्वनिफीत न्यायालयात ऐकवण्यात आली. परंतु तीत राऊत यांनी कंगनाच्या नावाचा कुठेही उल्लेख केलेला नाही, असा दावा राऊतांच्या वकिलांनी केला. त्यावर ट्विटर आणि वृत्तवाहिन्यांसमोर जे बोललात तसे धाडस न्यायालयातही दाखवा, असे कंगना आणि राऊत यांना सुनावताना राऊत यांच्या मुलाखतीची पूर्ण चित्रफीत सादर करण्याचे आदेश न्यायालयाने दिले.



 कंगना रानौतचे मुंबईतले कार्यालय अनधिकृत असल्याचं सांगत महापालिकेने हातोडा चालवला. कंगनाच्या कार्यालयातील काही भाग अवैधरित्या बांधल्याचं सांगत मुंबई महापालिकेने या कामावर बुल्डोझर चालवला. पण मुंबई उच्च न्यायालयाने या पाडकामाला स्थगिती दिल्यानंतर हे पाडकाम थांबवण्यात आले.  दरम्यान, बांधकामावर कारवाई सुरु असताना कंगना रानौत मुंबईमध्ये दाखल झाली. त्यावेळी विमानतळावर शिवसेनेच्या भारतीय कामगार सेनेकडून आंदोलन करत घोषणाबाजी करण्यात आली. मुंबई महापालिकेच्या या कारवाईला न्यायालयाकडून स्थगिती दिल्यानंतर महापालिकेचे वॉर्ड अधिकारी आणि शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांना प्रतिवादी करण्याची  कंगना रानौत हिची मागणी न्यायालयाने मान्य केली.  


कंगना रानौतच्या कथित अनधिकृत कार्यालयावर मुंबई महापालिकेने केलेल्या तोडकामावरून न्यायालयाने महापालिकेला खडे बोल सुनावले आहेत. हा सगळा प्रकारच संशयास्पद असल्याचं न्यायालयाने म्हटले. कंगनाने केलेल्या याचिकेची सुनावणी न्यायमूर्ती एस. जे. कथावाला आणि न्यायमूर्ती छागला यांच्या खंडपीठाकडे सुरू आहे. मुंबई महापालिकेने कारवाई करताना स्वतःचेच नियम पाळले नाहीत असे कोर्टाने म्हटले. अनधिकृत बांधकाम रोखण्यासाठी लावलेली नोटीशीचे फोटो जोडले नसल्याबद्दल न्यायालयाने कानउघडणी केली. 


तसेच नोटीस लावल्यावर काही वेळ का दिला जात नाही असे न्यायालयाने विचारले. कंगनाच्या कार्यालयाच्या इमारतीजवळीच इतर इमारतींवर कारवाई करताना न्यायालयाने याआधी काही दिवसांचा अवधी दिला होता. मग इथे हा अवधी का दिला गेला नाही, असा सवाल न्यायालयाने केला. नोटीस चिकटवल्यावर अवघ्या २४ तासांत कारवाई झालीच, कशी असा सवाल न्यायालयाने केलाय. न्यायलयाने सुनावणीत वॉर्ड ऑफिसर भाग्यवंत लाटे यांची चांगलीच कानउघडणी केली. कंगनाने दाखल केलेल्या या दाव्यात तिने नुकसान भरपाई म्हणून दोन कोटींची मागणी केली आहे.