मुंबई : भारतीय नौदलाची ताकद वाढण्याच्या दृष्टीने बुधवारी आणखी एक पाऊल पुढे टाकण्यात आले. कलवरी वर्गातील तिसरी पाणबुडी आयएनएस करंजचं माझगांव डॉकमध्ये जलावतरण झालं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यापुढील काही महिने आयएनएस करंज पाणबुडी समुद्रातील चाचण्यांना सामोरी जाईल. डिसेंबर अखेरीस ही पाणबुडी नौदलाच्या ताफ्यात दाखल होणं अपेक्षित आहे.


16 जुलै 2008 ला म्हणजे तब्बल 10 वर्षापूर्वी आयएनएस करंज पाणबुडीच्या बांधणीला माझगांव डॉकमध्ये सुरुवात झाली. तब्बल 6 वर्षे उशीराने का होईना करंज पाणबुडीचा बुधवारी दिमाखात जलावतरण सोहळा पार पडला. 


नौदल प्रमुख अँडमिरल सुनील लांबा यांच्या पत्नी रीना लांबा यांच्या हस्ते हे जलावतरण झाले. एका मोठ्या तराफ्यावर असलेली पाणबुडी नौदलाच्या गोदीमध्ये कार्यक्रमानंतर नेण्यात आली.


करंज पाणबुडीची काय वैशिष्ट्ये  -


- आयएनएस करंजमुळे भारताची ताकद वाढली


- वजन सुमारे 1700 टन.


- सोनारवर चटकन ओळखता येणार नाही रचना आणि अंतर्गत यंत्रणा.
 
- समुद्रात सलग 40 दिवस संचार करण्याची क्षमता.


- एका पल्ल्यात 5000 किमीपेक्षा जास्त अंतर कापण्याची क्षमता.


- पाण्याखालून Torpedoes बरोबर क्षेपणास्त्र डागण्याची अनोखी क्षमता. 


- पाण्याखाली 350 मीटरपर्यंत खोल जाण्याची क्षमता. 


पुढील काही महिने आता करंज पाणबुडीचा विविध चाचण्यांमध्ये कस लागणार आहे, डिसेंबरपर्यंत करंज नौदलाच्या ताफ्यात दाखल होणे अपेक्षित आहे. कलवरी वर्गातील दुसरी पाणबुडी आयएनएस खंदेरीही नौदल ताफ्यात येत्या एक ते दोन महिन्यात दाखल होईल. कलवरी वर्गातील उरलेल्या 3 पाणबुडया 2020 पर्यंत नौदलाच्या ताफ्यात दाखत होत नौदलाच्या सामर्थ्यांत मोलाची भर टाकणार आहेत.