मुंबई : मुंबईतल्या सोफिटेल हॉटेलमध्ये कर्नाटकातले बंडखोर आमदार उतरले आहेत. भाजपा घोडेबाजार करुन कर्नाटकमधील काँग्रेस-जेडीएसचे सरकार अस्थिर करत असल्याचा आरोप काँग्रेसनं केला आहे. सोफिटेल हॉटेलसमोर युवक काँग्रेसच्या वतीनं दोन तर काँग्रेसचं एक आंदोलन अशी तीन आंदोलनं काँग्रेसतर्फे करण्यात आली. एकाच वेळी तीन आंदोलनं करण्यात आल्यामुळे काँग्रेसमध्ये एकवाक्यता नसल्याचं समोर आलं आहे. दरम्यान  आंदोलनकर्त्यांनी सोफिटेल हॉटेलसमोर भाजपाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कर्नाटकमध्ये झालेल्या राजकीय भुकंपाचे हादरे बंगळुरूसोबतच मुंबई, दिल्लीतही बसत आहेत. काँग्रेस, जेडीएसच्या १२ आमदारांनी राजीनामे दिलेत. त्यापैकी काही आमदार सध्या मुंबईत सोफिटेल हॉटेलात मुक्कामाला आलेत.


दरम्यान सुत्रांच्या माहितीनुसार आणखी ४ ते ५ आमदार राजीनाम्याच्या तयारीत असल्याचं समजतंय. त्यातच एच डी कुमारस्वामी यांच्याऐवजी सिद्धरामय्या यांच्याकडे मुख्यमंत्रीपद सोपवलं तर ही स्थिती नियंत्रणात येऊ शकते, असा अंदाज लावला जातोय. राजीनामा दिलेल्या काँग्रेस आमदारांपैकी अनेक जण सिद्धरामय्या यांच्या गोटातले आहेत. मात्र या सत्तांतरासाठी कुमारस्वामी तयार होतील का याबाबत शंकाच आहे.


सरकार वाचवण्यासाठी काँग्रेसच्या बंगळुरू आणि दिल्लीत रात्रभर बैठका झाल्या. पक्षाची सर्व जबाबदारी सिद्धरामय्यांवर सोपवण्यात आली आहे. मंगळवार ९ जुलै रोजी सिद्धरामय्या यांनी काँग्रेसच्या आमदारांची बैठक बोलवाली आहे. काँग्रेसचे ९ आणि जेडीएसचे ३ अशा १२ आमदारांनी विधानसभा अध्यक्षांच्या कार्यालयाकडे राजीनामा धाडलाय. याबाबत सोमवारीच निर्णय होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री कुमारस्वामी परदेशातून परतले आहेत.