मुंबई: संपूर्ण देशाला हादरवून टाकणाऱ्या मुंबईवरील २६\११ हल्ल्यासंदर्भात मुंबईचे माजी पोलीस आयुक्त राकेश मारिया यांनी एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. या हल्ल्यावेळी मुंबई पोलीस दलातील तुकाराम ओंबळे यांच्या शौर्यामुळे अजमल कसाब हा एकमेव दहशतवादी जिवंत पकडला गेला होता. मात्र, कसाब ठार झाला असता तर त्याच्यासह इतरांना हिंदू दहशतवादी ठरवण्याची योजना लष्कर-ए-तोयबाने आखली होती. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कसाबला पोलिसांनी ताब्यात घेतले तेव्हा त्याच्याकडे एक बोगस ओळखपत्र मिळाले. यावर समीर चौधरी असे नाव होते. या ओळखपत्राच्या साहाय्याने मृत दहशतवाद्यांना हिंदू ठरवण्याचा डाव होता. मात्र, कसाब जिवंत सापडल्यामुळे हा प्रयत्न फसला. यानंतर अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमला कसाबला मारण्याची सुपारी देण्यात आली होती. मुंबईवरील हल्ल्याचा पुरावा नष्ट करण्यासाठीच ही सुपारी देण्यात आली होती, असा दावा राकेश मारिया यांनी त्यांच्या 'लेट मी से इट नाऊ' या आत्मचरित्रात केला आहे.


त्यामुळे कसाब मेला असता तर त्याच्याकडील ओळखपत्रामुळे तो हिंदू असल्याचे वाटले असते. यानंतर प्रसारमाध्यमांनी मुंबई हल्ल्यासाठी हिंदू दहशतवाद्यांना जबाबदार धरले, असते असे मारिया यांनी पुस्तकात म्हटले आहे. 


मुंबई हल्ल्यानंतर पोलिसांना दहशतवादी अजमल कसाबचा फोटो जारी करायचा नव्हता. आम्हाला अतिरेक्यांची माहिती मीडियात लीक होऊन द्यायची नव्हती. मात्र, केंद्रीय यंत्रणांमुळे कसाबाचा फोटो प्रसारमाध्यमांना मिळाला. हा फोटो जेव्हा समोर आला तेव्हा यामध्ये कसाबच्या हातात हिंदू लोक वापरतात तसा लाल धागा बांधला होता, असा दावा मारिया यांनी पुस्तकात केला आहे. मुंबईत २६ नोव्हेंबर २००८मध्ये पाकिस्तानातून १० अतिरेकी आले होते. मुंबईत त्यांनी तीन ठिकाणी हल्ले केले होते. या हल्ल्यात १६०हून अधिक लोक ठार झाले होते.