भांडण सोडवता सोडवता गेला आरपीएफ जवानाचा जीव; रेल्वे फलाटावरच दुर्दैवी मृत्यू
Kasara Accident : कसारा रेल्वे स्थानकात घडलेल्या या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली आहे. आरपीएफ जवानाच्या अपघाती मृत्यूने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
चंद्रशेखर भुयार, झी मीडिया, बदलापूर : कसारा रेल्वे स्थानकात (kasara railway station) एका आरपीएफ (RPF) जवानाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. प्रवाशांचे भांडण सोडवत असतानाच या आरपीएफ जवानाला मृत्यूने गाठलं आहे. आरपीएफ जवानाच्या दुर्दैवी मृत्यूने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा नोंद केली असून पुढील तपास सुरु केला आहे.
मध्य रेल्वेवरील कसारा स्थानकात हा सगळा धक्कादायक प्रकार घडला. कसारा रेल्वे स्थानकातील कर्तव्यावर असलेल्या आरपीएफ जवान दिलीप फकिरा सोनवणे यांचा अपघाती मृत्यू झाला आहे. एक्स्प्रेस आणि रेल्वे फलाटामधील पोकळीत पडून, चालत्या एक्स्प्रेसखाली आल्याने आरपीएफ जवान डी.एफ. सोनवणे यांचा मृत्यू झाला आहे. रविवारी सकाळी हा सगळा प्रकार घडला आहे.
रविवारी सकाळी सातच्या सुमारास गाडी क्रमांक 04152 कानपुर सेंट्रल एक्स्प्रेस कसारा स्थानकाच्या फलाट क्रमांक एकवर आली होती. त्यावेळी कानपुर सेंट्रल एक्स्प्रेस गाडीतील एका बोगीत प्रवाशांची भांडणे सुरु होती. हा सगळा प्रकार सोनवणे यांनी पाहिला. त्यामुळे ते भांडण सोडवण्यासाठी ते ट्रेनच्या बोगीमध्ये चढले. भांडण सोडवत असताना अचानक गाडी सुरू झाली. त्यामुळे सोनवणे गाडीतून उतरण्याचा प्रयत्न करत होते. त्याचवेळी त्यांचा तोल गेला आणि ते फलाट आणि एक्स्प्रेसच्या पोकळीत अडकून, गाडीखाली आले. त्यातच सोनवणे यांचा मृत्यू झाला.
गाडी सुरू झाल्यामुळे सोनवणे गाडीतून उतरत असताना त्यांचा तोल गेला होता. त्यामुळे ते फलाट आणि गाडीच्या पोकळीमध्ये पडले. त्यामुळे त्यांच्या डोक्याला गाडीचा जोरदार फटका बसला. यामुळे सोनवणे यांचा जागीच मृत्यू झाला. सोनवणे यांच्या अपघाती निधनाने सर्वत्र हळ हळ व्यक्त केली जात आहे.
आरपीएफचे जवान दिलीप सोनवणे हे कुटुंबासह कल्याणमध्ये राहत होते. त्यांना दोन मुले आणि एक मुलगी आहे. शनिवारी रात्री कल्याणहून कसारा येथे रात्र पाळीसाठी ते कामावर गेले होते, मात्र रविवारी सकाळी 6:45 वाजता हा अपघात झाला आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला.