मुंबई : विधानसभा निवडणुकांच्या प्रचारतोफा सध्या चांगल्याच धडाडत आहेत. सर्वच पक्षातील दिग्गजांपासून ते कार्यकर्त्यांपर्यंत प्रत्येकाने या प्रचारांच्या रणधुमाळीत उडी घेतली आहे. एकिकडे विविध मुद्द्यावर लक्ष देत विरोधक भाजपावर निशाणा साधत आहेत. तर, दुसरीकडे भाजपा मात्र जम्मू काश्मीर येथून अनुच्छेद ३७० हटवण्याच्याच मुद्द्याला अधोरेखित करत याच बळावर निवडणूक लढवत आहे. यातच आता आणखी एका नव्या मुद्द्याची, विशेष म्हणजे जम्मू- काश्मीरशी संबंधितच एका मुद्द्याची यात भर पडली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काँग्रेसला रामराम ठोकणाऱ्या कृपाशंकर सिंह यांनी या मुद्द्याला नव्याने तोंड फोडलं आहे. ऑनलाईन फूड आणि ग्रोसरी डिलीव्हरी करणाऱ्या ऍमेझॉन, बिग बास्केट आणि ग्रोफर्स यांसारख्या कंपन्याना उद्देशून त्यांनी एक पत्र लिहिलं आहे. 


काश्मिरी सफरचंदांची मागणी पाहता, त्यांची ऑनलाईन पद्धतीने जास्तीत जास्त विक्री करण्यात यावी असं त्यांचं म्हणणं आहे. जे त्यांनी या पत्राच्या माध्यमातून मांडलं आहे. इतकच नव्हे, तर काश्मिरी सफरचंदांच्या विक्रीसाठी खास विक्रीदर आणि काही खास सवलतीही द्याव्यात अशी मागणीही त्यांनी केली आहे. काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला चालना बळकटी मिळावी यासाठीच सिंह यांनी हे विनंतीपर पत्र लिहिल्याचं कळत आहे. 


मोदी सरकारकडून अनुच्छेद ३७० हटवण्याच्या निर्णयाचं कृपाशंकर सिंह यांच्याकडून समर्थन करण्यात आलं होतं. ज्यानंतर याच भूमिकेमुळे पुढे जाऊन काँग्रेसशी असणाऱ्या त्यांच्या वाटा वेगळ्या झाल्या होत्या. 


सर्वाधिक सफरचंदांचं उत्पन्न काश्मीरमधून 


देशभरातील सफरचंदांपैकी सर्वाधिक म्हणजेच ७५ टक्के भाग हा काश्मीरमधून येतो. या व्यवसायातून दरवर्षी १२०० कोटींहून अधिक नफा मिळवला जातो. ज्याचा काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला मोठा आधार आहे.