कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये भाजपने शिवसेनेला धक्का दिला आहे. स्थायी समिती सभापती पदाच्या निवडणुकीत भाजपचा विजय झाला आहे. कल्याण डोंबिवलीमधील सत्ताधारी शिवसेनेला हा मोठा धक्का मानला जात आहे. भाजपच्या विजयामध्ये काँग्रेसनेही मोठी भूमिका बजावली आहे. काँग्रेसने भाजपच्या पारड्यात मत टाकल्यामुळे भाजपचा विजय सोपा झाला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कल्याण डोंबिवली महापालिकेच्या स्थायी समिती सभापती निवडणुकीसाठी शिवसेनेच्या गणेश कोट आणि भाजपच्या विकास म्हात्रे यांनी अर्ज दाखल केला होता. १६ सदस्य असणाऱ्या स्थायी समितीमध्ये ८ सदस्य शिवसेनेचे, ६ भाजपचे, आणि मनसे-काँग्रेसचा प्रत्येकी १-१ सदस्य होता. सदस्य संख्येचा विचार करता शिवसेनेचा विजय सोपा मानला जात होता. पण शिवसेना सदस्य वामन म्हात्रे निवडणुकीला गैरहजर राहिले. राज्यात महाविकासआघाडी असल्यामुळे काँग्रेस सदस्य शिवसेनेला मत देईल असं बोललं जात होतं. पण निवडणुकीत मनसे आणि काँग्रेस सदस्याने भाजपला मत दिलं.


मनसे आणि काँग्रेसने मत दिल्यामुळे विकास म्हात्रे यांचा विजयाचा मार्ग मोकळा झाला. पण सत्ताधारी शिवसेनेवर मात्र मोठी नामुष्की ओढावली.