कशी आहे छगन भुजबळांची तब्येत? केईएम रुग्णालयाच्या डीनची प्रतिक्रिया
छगन भुजबळ यांची प्रकृती सध्या ठिक असली तरी त्यांच्यावर शस्त्रक्रिया करणं गरजेचं असल्याचं मत केईएम रूग्णालयाचं डीन डॉ अविनाश सुपे यांनी व्यक्त केलंय.
मुंबई : छगन भुजबळ यांची प्रकृती सध्या ठिक असली तरी त्यांच्यावर शस्त्रक्रिया करणं गरजेचं असल्याचं मत केईएम रूग्णालयाचं डीन डॉ अविनाश सुपे यांनी व्यक्त केलंय. छगन भुजबळ यांची जामिनावर सुटका झाली असली तरी केईएम रूग्णालयातच त्यांनी उपचार करून घेणं पसंत केलंय. माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना शुक्रवारी जामीन मिळाल्यानंतर त्यांची तांत्रिक सुटका रविवारी रूग्णालयातच झाली. पोलिसांनी रूग्णालयात भुजबळांच्या सह्या घेतल्या आणि त्यांची तांत्रिक सुटका केली. शुक्रवारी जामीन मिळाल्यानंतर सलग २ दिवस सुट्ट्या असल्यामुळे भुजबळ यांची सुटका होऊ शकली नव्हती. सध्या प्रकृती ठिक नसल्याने भुजबळांवर केईएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
छगन भुजबळ यांचा बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी १४ मार्च २०१६ पासून - २ वर्षापासून मुंबईच्या आर्थर रोड जेलमध्ये मुक्काम होता. छगन भुजबळ तरूंगात असताना राष्ट्रवादीच्या काही नेत्यांनी देखील त्यांची भेट घेतली होती. छगन भुजबळ यांना जामीन मिळाल्यामुळे त्यांच्यासाठी हा मोठा दिलासा मानला जात आहे. अनेक दिवसापासून छगन भुजबळ यांनी जामीन मिळवण्यासाठी प्रयत्न केले होते, मात्र सतत त्यांना जामीन नाकारला जात होता, छगन भुजबळ यांची प्रकृती तुरूंगात सतत ढासळत असल्याची तक्रार देखील होत होती. छगन भुजबळ यांना जामीन मंजूर झाल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी जल्लोष केला.