केरळ पुरग्रस्तांसाठी एसटीकडून १० कोटींची मदत
केरळ पूरग्रस्तांसाठी एसटी महामंडळ आणि कर्मचाऱ्यांनी १० कोटींची मदत दिली आहे.
मुंबई : मुसळधार पावसाने केरळचे जनजीवन पुरते कोलमडले. आता कुठे पाऊस थांबल्याने मदतीचा ओघ सुरु आहे. केरळच्या मदतीसाठी महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ आणि कर्मचाऱ्यांनी हात पुढे केलाय. केरळ पूरग्रस्तांसाठी एसटी महामंडळ आणि कर्मचाऱ्यांनी १० कोटींची मदत दिली आहे. परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांच्यासह एसटी कर्मचाऱ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांच्याकडे हा धनादेश सुपूर्द केला आहे.
केरळमधील पूराने हाहाकार माजवल्याने महाराष्ट्रासह देश आणि जगभरातून केरळसाठी मदतीचा ओघ सुरु आहे. एसटी कर्मचारी आणि महामंडळानेही केरळ पूरग्रस्तांना मदत देण्यासाठी कंबर कसली. सर्व कामगार संघटनांनी कामगारांचं एक दिवसाचं वेतन केरळ पूरग्रस्तांसाठी देण्याची घोषणा केली. मात्र परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी कामगारांचा केवळ अर्ध्या दिवसाचा पगार कापण्याचा आणि तेवढीच रक्कम एसटी प्रशासनामार्फत देण्याची सूचना केली. त्यानुसार एकूण १० कोटी रुपयांची रक्कम जमा करण्यात आली असून आज दुपारी मुख्यमंत्र्यांना त्याचा धनादेश देण्यात आला.
यावेळी रावते यांच्यासह महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक रणजीत सिंह देओल, एसटी कर्मचारी रामदास पवार, योगेश मुसळे, नितीन गदमळे, आप्पा वरपे, कमलाकर साळवे, संदीप कातकर यांच्यासह विविध कामगार संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.