हिंमत असेल तर... अनिल परब यांचं किरीट सोमय्या यांना आव्हान
दापोलीत भाजप-राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आमने सामने
मुंबई : भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांच्या दापोली दौऱ्यावरुन कोकणात राजकीय वातावरण तापलं आहे. परिवहन मंत्री आणि शिवसेना नेते अनिल परब (Anil Parab) यांचं दापोली तालुक्यातील मुरूड इथलं रिसॉर्ट बेकायदा असल्याचा आरोप सोमय्या यांनी केला आहे. याचसंदर्भात किरीट सोमय्या आज कोकण दौऱ्यावर आहेत.
दरम्यान, हिंमत असेल तर रिसॉर्ट तोडून दाखवा असं आव्हान परिवहन मंत्री अनिल परब यांनी किरीट सोमय्या यांना दिलं आहे. रिसॉर्ट तोडायला सोमय्या पालिकेचे कर्मचारी आहेत का? रिसॉर्ट बेकायदेशी आहे ते ठरवणारे हो कोण? असे सवाल विचारत अनिल परब यांनी किरीट सोमय्या फक्त नौटंकी करत असल्याचं म्हटलं आहे.
जर कुठल्या कायद्याचा भंग झाला असेल तर संबंधित विभागाने कारवाई करावी, अनिल परब यांचं नाव घेऊन वातावरण खराब करत आहेत, असंही अनिल परब यांनी म्हटलं आहे. तिथल्या ग्रामस्थांचा फोन आला होता की आम्ही किरीट सोमय्यांना विरोध करु, जर त्यांच्या व्यवसायावर परिणाम होणार असेल तर ते विरोध करणारच ना, असंही अनिल परब यांनी म्हटलं आहे.
याबाबतच आधीच याचिका दाखल केली आहे, मी पुन्हा हायकोर्टात जाणार आहे, माझा काही संबंध नसताना वारंवार अशा पद्धतीने आरोप करुन माझी प्रतिमा खराब करण्याचं काम होत आहे, तसंच लोकांच्या मनात संभ्रम निर्माण करण्याचं काम केलं जात आहे. महाविकास आघाडीच्या बाबतीत संभ्रम निर्माण करायचा, मंत्र्यांच्या बाबतीत संभ्रम निर्माण करायचा, पुढच्या आठवड्यात याबाबतीत आणखी एक याचिका दाखल करणार असल्याचं अनिल परब यांनी म्हटलं आहे.
विनायक राऊत यांची टीका
शिवसेना ही दिल्लीच्या तख्तासमोर झुकणार नाही, असं शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी म्हटलं आहे. नितेश आणि निलेश राणे यांना आपण किंमत देत नाही, ते संपलेलं गणित आहे, हातोडा, कुदळ, फावडा काहीही आणा आम्ही घाबरत नाही. असंही विनायक राऊत यांनी म्हटलं आहे.