`मेगा कोविड सेंटरमध्ये हजारो कोटींचा महाघोटाळा`
एक- दोन नव्हे तर तब्बल....
अमित जोशी, झी मीडिया, मुंबई : कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर राज्यात उभारण्यात आलेल्या मेगा कोविड सेंटरमध्ये एक दोन नव्हे, तर तब्बल एक हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा झाल्याचा गंभीर आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. यासंदर्भातील श्वेतपत्रिका काढण्याची मागणी सोमय्या यांनी राज्याच्या मुख्य सचिवांकडे पत्राद्वारे केली आहे.
मेगा कोविड सेंटर उभं करण्याबाबत टेंडर प्रक्रिया कशा रितीनं राबवली, किती रुग्णांनी यामध्ये उपचार घेतले, कोविड सेंटर उभं करण्यासाठी किती खर्च आला या सर्व गोष्टींबाबत अनियमितता आहे, तक्रारी आहेत. हे महाकोविड सेंटर म्हणजे महाघोटाळा असल्याचा आरोप सोमय्या यांनी केला आहे.
दरम्यान, याच मुद्द्यावरुन मनसेचीही काही दिवसांपूर्वी आक्रमक भूमिका पाहायला मिळाली होती. कोरोनाच्या संकटकाळात राजकारण होऊ नये, यासाठी महापालिकेतील विरोधी पक्ष गप्प आहेत. मात्र, शिवसेनेकडून याचा फायदा उठवला जात असून महानगरपालिकेत मोठा भ्रष्टाचार सुरु असल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून (मनसे) करण्यात आला होता.
ज्याअंतर्गत महापौर किशोरी पेडणेकर यांनी कोविड आणि जम्बो सेंटरचे कंत्राट आपल्या मुलाला मिळवून दिल्याचा आरोप करण्यात आला होता. शिवाय महापौरांनी नैतिक जबाबदारी स्वीकारत आपल्या पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणीही पक्षाकडून करण्यात आली होती.