मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि अन्वय नाईक यांच्यात ३० व्यवहार झाल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्यांनी केला. असे व्यवहार झाले असतील तर सोमय्यांनी सिद्ध करावे असे आव्हान शिवसेना नेते रविंद्र वायकर यांनी दिलंय. तसेच सोमय्यांना कायदेशीर मार्गाने उत्तर देणार असून अब्रु नुकसानीचा दावा ठोकणार असल्याचे वायकर यावेळी म्हणाले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अन्वय नाईक यांच्या कुटुंबियांसोबत झालेला व्यवहार पूर्णतः कायदेशीर मार्गाने झालेला आहे. याची नोंदही आम्ही निवडणूक प्रतिज्ञापत्रात केली आहे, आयकर विभागालाही कळवलं असल्याचे वायकर म्हणाले. 


मराठी माणसानं कोकणात कायदेशीर मार्गानं जमिनी घ्यायच्या की नाहीत ? की फक्त परप्रांतियांनी घ्यायच्या ? असा प्रश्न वायकरांनी उपस्थित केला. ३० व्यवहार अजिबात झालेले नाहीत, झाले असतील तर सिद्ध करावेत. बाप दाखव नाही तर श्राद्ध घाल असे वायकर म्हणाले. 



अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी अर्णबला झालेली अटक आणि या प्रकरणावरील लक्ष वळवण्यासाठी हे आरोप केले जातायत. केवळ ठाकरे हे नाव असल्यानं बिनबुडाचे आरोप केले जात असल्याचे वायकर म्हणाले.


दिवंगत अन्वय नाईक आत्महत्येसाठी जबाबदार व्यक्तीला पाठीशी घालण्याच्या प्रयत्नात किरीट सोमय्या यांनी त्यांच्या जमीन व्यवहाराला मध्ये आणून आपली आणि भाजपाची हीन मानसिकता दर्शवली. रिपब्लिक चॅनेलमध्ये भाजपा खासदार राजीव चंद्रशेखर हे भागीदार होते. गोस्वामी यांचा भाजपाशी थेट संबंध असल्याचे कॉंग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यावेळी म्हणाले. 


अन्वय नाईक यांच्या आत्महत्येचा आणि जमीन व्यवहाराचा संबंध काय? असा प्रश्न सावंतांनी उपस्थित केला. मराठी कुटुंबाची वाताहत झाली त्याचे सोमय्या यांना काहीही पडले नाही. आरोपी भाजपाशी संबंधित असल्याने फडणवीस सरकारने आत्महत्या प्रकरण दाबले. अर्णब भाजपासाठी काम करतो. भाजपा हा पक्ष महाराष्ट्र द्वेष्टा आहे हे स्पष्ट असल्याचे सावंत म्हणाले.