ईशान्य मुंबईत भाजपकडून किरीट सोमय्यांनाच उमेदवारी- आशिष शेलार
भाजपाचा उमेदवार दुसरा पक्ष कसा ठरवेल?
मुंबई: आगामी लोकसभा निवडणुकीत ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघात भाजपकडून किरीट सोमय्या यांनाच उमेदवारी मिळेल, अशी ग्वाही भाजपचे मुंबई प्रदेशाध्यक्ष आशिष शेलार यांनी दिली. ते सोमवारी झी २४ तासच्या 'मुक्तचर्चा' या कार्यक्रमात बोलत होते. शिवसेना आणि भाजप यांनी युतीची घोषणा केल्यानंतरही ईशान्य मुंबईतील शिवसैनिकांनी किरीट सोमय्यांना मतदान करणार नाही, अशी ठाम भूमिका घेतली होती. त्यामुळे सोमय्या यांच्या उमेदवारीबाबत शंका निर्माण झाली होती. मात्र, आशिष शेलार यांनी या सर्व शक्यता फेटाळून लावल्या. शेलार यांनी पूनम महाजन आणि किरीट सोमय्यांबाबतची पक्षाची भूमिका मांडली. पूनम महाजन आणि किरीट सोमय्या यांचे मतदारसंघ बदलण्याचा चर्चा वायफळ आहेत. भाजपाचा उमेदवार दुसरा पक्ष कसा ठरवेल असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
किरीट सोमय्या यांनी पुन्हा शिवसेनेला डिवचलं
मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत किरीट सोमय्या यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर थेट आरोप केले होते. या काळात त्यांनी सातत्याने शिवसेनेच्या कारभारात गैरव्यवहार असल्याची प्रकरणेही खोदून काढली होती. तेव्हापासून किरीट सोमय्या हे शिवसैनिकांच्या रडारवर आहेत. गेल्या लोकसभा निवडणुकीत मोदी लाट व शिवसेना-भाजप या घटकांमुळे सोमय्या यांचा विजय सुकर झाला होता. मात्र, यंदाच्या निवडणुकीत सोमय्यांना उमेदवारी मिळाल्यास शिवसैनिकांची मते मनसेकडे वळू शकतात. २००९ च्या निवडणुकीत मनसेला ईशान्य मुंबईत मोठ्याप्रमाणावर मते मिळाली होती. या मतविभाजनामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय पाटील यांनी २००९ मध्ये सोमय्यांचा पराभव केला होता.