शेतकऱ्यांचं लाल वादळ मुंबईत, आझाद मैदानात आज किसान मोर्चाची भव्य सभा
शेतकरी `चलो राजभवन` म्हणत राजभवनाकडे कूच करणार
मुंबई : शेतकऱ्यांचं लाल वादळ मुंबईत दाखल (Farmers at Mumbai Azad Maidan) झालं आहे. आज आझाद मैदानात किसान मोर्चाची (Kisan Morcha) भव्य सभा होणार आहे. या सभेला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारही (Sharad Pawar will address farmer) सहभागी होणार आहेत. तसेच आज आंदोलक राज्यपालांची भेट घेऊन कृषी कायद्यासंदर्भात निवेदन देणार आहेत.
मुंबईत धडक दिलेल्या किसान मोर्चाची आज भव्य सभा होणार आहे. आझाद मैदानात होणाऱ्या या सभेला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार उपस्थित राहणार आहेत. हजारो शेतकऱ्यांनी आझाद मैदानात ठिय्या दिला आहे. आझाद मैदानात सभा झाल्यानंतर शेतकरी 'चलो राजभवन' म्हणत राजभवनाकडे कूच करणार आहेत. किसान मोर्चाचे प्रतिनिधी राज्यपालांची भेट घेऊन त्यांना कृषिकायद्यासंदर्भात निवेदन देणार आहेत. केंद्र आणि राज्य सरकारच्या कृषि कायद्यांविरोधात हा मोर्चा आहे.
या मोर्चाच्या माध्यमातून दिल्लीत सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या मोर्चाला पाठिंबाही देण्यात आला आहे. हे हजारो आदिवासी शेतकरी शनिवारी दुपारी नाशिकमधून निघाले. इगतपुरीमधल्या मुक्कामानंतर रविवारी सकाळी पायी कसारा घाट उतरुन वाहनांतून ते मुंबईच्या दिशेनं रवाना झाले. रविवारी संध्याकाळी सहाच्या सुमाराला हा मोर्चा आझाद मैदानात पोहोचला. त्यानंतर आज सोमवारी शेतकऱ्यांची भव्य सभा होणार आहे.
केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरोधात आज सांगली ते कोल्हापूर ट्रॅक्टर मोर्चा काढला जाणार आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने ट्रॅक्टर मोर्चा काढला जाणार आहे.. सांगलीतील क्रांतीसिह नाना पाटील पुतळा ते कोल्हापूरातील दसरा चौकापर्यंत हा मोर्चा काढला जाणार आहे. सकाळी 10 वाजता या मोर्चाला सुरुवात होणार असून या मोर्चात सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या संख्येनं ट्रॅक्टर घेऊन सहभागी होणार आहेत असं स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने सांगण्यात आलं आहे.