महिना उलटला तरी दोघांचंच सरकार, कधी होणार मंत्रिमंडळ विस्तार?
अनेक दिवसांच्या सत्तानाट्यानंतर अखेर राज्यात नव सरकार (Eknath Shinde-Bjp) स्थापन झालं. एकनाथ शिंदे गट आणि भाजपने सरकार स्थापन केलं.
मुंबई : अनेक दिवसांच्या सत्तानाट्यानंतर अखेर राज्यात नव सरकार (Eknath Shinde-Bjp) स्थापन झालं. एकनाथ शिंदे गट आणि भाजपने सरकार स्थापन केलं. त्यानंतर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnvis) या दोघांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. अवघ्या काही दिवसांमध्ये 500 पेक्षा अधिक शासन निर्णयही (GR) काढले. मात्र येऊन येऊन एकच प्रश्न विचारला जातोय तो म्हणजे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार केव्हा होणार? मंत्रिमंडळ विस्तार रखडण्याची नेमकी कारणं काय आहेत, हे आपण जाणून घेऊयात. (know why not maharashtra state govenrment cabinet expansion)
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी गेल्या 30 जूनला झाला. पण तब्बल एक महिना उलटला तरी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री असे दोघेच संपूर्ण राज्याचा कारभार चालवत आहेत. शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार, याकडं इच्छुकांसह अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलंय.
का रखडला मंत्रिमंडळ विस्तार?
दिल्लीतल्या भाजप श्रेष्ठींनी अद्याप मंत्रिमंडळ विस्ताराला परवानगी दिलेली नाही. कारण शिंदे गटांच्या आमदारांच्या अपात्रतेचा खटला सुप्रीम कोर्टात प्रलंबित आहे. या खटल्याचा काय निकाल लागतो, याकडं भाजप नेत्यांचं लक्ष आहे. कोर्टाच्या निकालानंतरच मंत्रिमंडळ विस्तार करावा, अशी भाजपची भूमिका असल्याचं समजतंय.शिवाय मंत्रिमडळ विस्तार करताना नव्या चेह-यांमध्ये भाजपचे जुने निष्ठावंत चेहरे डावलले जाऊ नयेत, याची खबरदारी भाजपला घ्यावी लागणाराय.
दरम्यान, लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होईल, असं शिंदे-फडणवीस सांगतायत. तर मंत्र्यांचा शपथविधी रखडल्यानं सरकारवर टीका करण्याची आयती संधी विरोधकांना मिळालीय.
आपण शिवसेनेचे मुख्यमंत्री असल्याचा दावा एकनाथ शिंदे करतायत. पण रखडलेल्या विस्तारामुळे हे सरकार दिल्ली हायकमांडच्या इशा-यावर चालत असल्याचा आरोप केला जातोय.