कोहिनूर स्क्वेअर गैरव्यवहार : ईडी चौकशीसाठी निघालेल्या राज ठाकरेंना पत्नी, मुलाचाही साथ

उन्मेष जोशींची सलग तीन दिवस तर राजन शिरोडकरांची दोन दिवस सलग आठ तास मॅरेथॉन चौकशी
मुंबई : कोहिनूर खरेदी कथीत गैरव्यवहार प्रकरणी आज राज ठाकरेंची ईडीच्या कार्यालयात चौकशी होणार आहे. सकाळी ११.०० वाजता राज ठाकरेंना ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी हजर व्हायचंय. यासाठी १०.३० च्या सुमारास राज ठाकरे आपल्या 'कृष्णकुंज' या निवासस्थानाहून रवाना झाले. यावेळी राज ठाकरे यांच्यासोबत त्यांची पत्नी शर्मिला ठाकरे आणि मुलगा अमित ठाकरे ईडी कार्यालयाकडे निघाले.
मुंबईत चार भागांवर जमावबंदी लागू
उल्लेखनीय म्हणजे, मुंबई पोलिसांनी चार पोलीस ठाण्यांच्या हद्दीत कलम १४४ लागू केलंय. यामध्ये मरीन ड्राईव्ह, एमआरए मार्ग पोलीस, आझाद मैदान, दादर पोलीस स्टेशन या भागांचा समावेश आहे.
मनसे नेत्यांची धरपकड
या कारवाईविरोधात बंद आणि इतर पद्धतीने निषेध करण्याचा इशारा इशारा मनसेने दिला होता. मात्र राज ठाकरेंनी शांतता बाळगण्याचं आवाहन कार्यकर्त्यांना दिलंय. त्यामुळे कोणत्याही आंदोलनाची घोषणा करण्यात आली नसली तरी ऐनवेळी विरोध प्रदर्शन केला जाण्याची शक्यता आहे. कायदा आणि सुव्यवस्था बिघडेल असं काहीही करू नका नाही तर कारवाई केली जाईल अशा सूचना मनसे कार्यकर्त्यांना नोटिशीच्या माध्यमातून देण्यात आल्या आहेत. बुधवारी दुपारपासूनच पोलिसांनी मनसेच्या काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलंय. तसंच राज ठाकरे यांच्या घराबाहेरचा पोलीस बंदोबस्तही वाढवण्यात आलाय. या पार्श्वभूमीवर मुंबईत काही अनुचित प्रकार टाळण्यासाठी मुंबई पोलिसांकडून अगोदरच मनसे नेत्यांची धरपकड सुरू करण्यात आलीय. मनसेचे प्रवक्ते संदीप देशपांडे यांनी पोलिसांनी ताब्यात घेतलंय.
पोलिसांचा कडक बंदोबस्त
राज ठाकरे आज ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी येणार आहेत. त्यासाठी ईडीच्या कार्यालयाला छावणीचं स्वरूप प्राप्त झालंय. परिसरात बॅरिकेडींग करण्यात आलंय. तसंच पोलिसांच्या अनेक गाड्या इथे आल्या आहेत. राज ठाकरे यांना चौकशीला बोलावण्यात आल्याने कार्यकर्त्यांमध्ये संताप आहे. त्यामुळे काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवलाय. बेस्ट बसेसनाही आज खिडक्यांना लोखंडी जाळी बसवण्यात आलीय.
कोहिनूर स्केअरप्रकरणी राज ठाकरेंच्या चौकशीवर लक्ष केंद्रीत करता यावं यासाठी आज उन्मेष जोशी आणि राजन शिरोडकर यांची चौकशी करण्यात येणार नाही. या दोघांची पुढील चौकशी सोमवारी करण्यात येणार आहे. उन्मेष जोशींची सलग तीन दिवस तर राजन शिरोडकरांची दोन दिवस सलग आठ तास मॅरेथॉन चौकशी करण्यात आली. शिरोडकर राज ठाकरेंचे निकटवर्तीय आहेत. सलग तीन दिवस उन्मेष जोशींची चौकशी करण्यात आली. शिरोडकरांकडे कोहिनूरसंदर्भातल्या काही कागदपत्रांची मागणी ईडीनं केलीय. तर राज ठाकरे आणि आपले व्यवहारिक संबंध 2008 पर्यंतच होते आणि त्याच्यानंतर आपला त्यांच्याशी कोणत्याही प्रकारे व्यवहारिक संबंध नाही असं त्यांनी सांगितलंय.
'कोहिनूर' महागात! ईडी चौकशी करत असलेलं प्रकरण नेमकं आहे तरी काय?
शिवसेना पक्षप्रमुखांकडून पाठराखण
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांची पाठराखण केलीय. कोहिनूर स्क्वेअरप्रकरणी राज ठाकरे यांची आज अंमलबजावणी संचालनालयाकडून चौकशी होणार आहे. या चौकशीतून काहीही बाहेर येणार नाही असं उद्धव ठाकरे म्हणाले.
'ती' पत्रकं कुणी छापली?
मुंबईतल्या लालबाग इथल्या रस्त्यावर बुधवारी रात्रीच्या सुमारास काही पत्रकं फेकण्यात आली आहेत. या पत्रकांमध्ये सत्ताधारी गटातील कथित गैरव्यवहाराची चौकशी करण्याची मागणी करणारा मजकूर छापण्यात आला असून, त्यांची चौकशी कधी करणार? असा सवाल उपस्थित करण्यात आलाय. ही पत्रकं कोणी छापली याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळू शकलेली नाही.