दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari)  आज सकाळी मसुरीला जाण्यासाठी निघाले होते. ते विमानातही जाऊन बसले. पण राज्यपालांना सरकारी विमान वापरण्याची परवानगी नसल्याचं सांगण्यात आलं आणि राज्यपाल त्या विमानातून उतरले. अर्थातच या घटनेनंतर जोरदार राजकारण सुरू होणं अपेक्षित होतंच, आणि तसंच घडलंय. काय आहे हा संपूर्ण प्रकार जाणून घ्या.   


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पोरखेळ चाललाय, असं म्हणत देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)  महाविकासआघाडी सरकारवर चिडलेत. त्याला कारण ठरलंय राज्यपाल आणि सरकारमधल्या नव्या वादाची ठिणगी. मसुरीला कार्यक्रमासाठी निघालेल्या राज्यपाल भगतसिंह कोश्यारींना शासकीय विमानातून उतरवण्यात आलं. 



 


राज्यपाल दौऱ्याला जाताना विमान हवं असल्यास सांगण्यात आलं होतं. त्यांनी महाराष्ट्र विमान प्राधिकरणाकडे अर्ज देखील केला जातो. महाराष्ट्र विमान प्राधिकरण राज्यपालांचे दौरे, त्यांच्या अर्जाची माहिती मुख्यमंत्री कार्यालयांकडे पाठवल्यावर मुख्यमंत्री कार्यालय त्यानुसार मान्यता देतात. आणि विमानाच्या प्रवासाला परवानगी मिळते. त्याचप्रमाणे राज्यपालांनी आपल्या दौ-याबाबत गेल्या आठवड्यात महाराष्ट्र विमान प्राधिकरणाकडे अर्ज केला होता


त्यासंदर्भात मुख्यमंत्री कार्यालयाकडे माहिती देण्यात आली होती.  पण राज्यपालांच्या डेहराडून दौ-याबाबत मुख्यमंत्री कार्यालयाकडून परवानगी मिळाली नाही. राज्यपाल विमानात बसल्यानंतर मान्यता नाही हे कळल्यावर सगळीकडे पुन्हा फोनाफोनी सुरू झाली. आणि राज्यपाल शेवटी स्पाईसजेटनं मसुरीला गेले. 


मुख्यमंत्र्यांनी असं का केलं? याबाबत शिवसेनेला विचारलं असता. आम्ही राजकारण करत नाही, असं शिवसेनेनं म्हटलं. पण त्याचवेळी १२ आमदारांच्या शिफारशीच्या मुद्द्याची राऊतांना आठवण आली.  या सगळ्या प्रकरणापासून अजित पवारांनी मात्र स्वतःला लांबच ठेवलं. विधानपरिषद आमदारांचा प्रस्ताव, परीक्षांबद्दलचे निर्णय, कोरोनासंदर्भात राज्यपालांनी बोलावलेली बैठक अशा जवळपास  डझनभर कारणांवरुन राज्यपाल विरुद्ध सरकार असा संघर्ष रंगलाय.... आता राज्यपालांना नाकारलेल्या सरकारी विमानाचा वाद जमिनीवर उतरायला थोडा वेळच लागेल, अशी चिन्हं आहेत.