मुंबई: काँग्रेसचे माजी नेते कृपाशंकर सिंह विधानसभा निवडणुकीत काँग्रेसविरोधात प्रचार करणार आहेत. काही दिवसांपूर्वीच कृपाशंकर सिंह यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला होता. यानंतर ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा होती. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मात्र, आता कृपाशंकर सिंह यांनी आपण कोणत्याही पक्षात प्रवेश करणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. अनुच्छेद ३७० संदर्भात काँग्रेसच्या भूमिकेमुळे कृपाशंकर सिंह नाराज होते. त्यामुळे त्यांनी पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. आता याच मुद्द्यावरून ते विधानसभा निवडणुकीच्या काळात काँग्रेसविरोधात प्रचार करणार आहेत. 


त्यांच्या काँग्रेसविरोधी प्रचाराला कोणाची रसद असणार, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, गेल्या काही दिवसांमध्ये भाजप नेत्यांशी त्यांची वाढलेली जवळीक पाहता कृपाशंकर सिंह बाहेरून सत्ताधाऱ्यांना मदत करण्याची शक्यता आहे. 


एकेकाळी मुंबई काँग्रेसमध्ये कृपाशंकर सिंह यांचा चांगलाच दबदबा होता. सांताक्रुझ विधानसभा मतदारसंघ हा कृपाशंकर यांचा पारंपारिक मतदारसंघ असून तो त्यांचा बालेकिल्ला आहे. मात्र, तिथे सध्या शिवसेनेचे संजय पोतनीस हे आमदार आहेत. युतीच्या जागावाटपात शिवसेना भाजपसाठी ही जागा सोडण्याची शक्यता नाही. त्यामुळे कृपाशंकर हे भाजपमध्ये गेले तरी त्यांना सांताक्रुझमधून विधानसभेची उमेदवारी मिळण्याची शक्यता कमीच होती. त्यामुळेच कृपाशंकर सिंह यांनी यंदा निवडणुकीपासून दूर राहण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले जाते.