कुणाल कामरा राज ठाकरेंच्या भेटीसाठी कृष्णकुंजवर
यावेळी कुणाल कामरा किर्ती कॉलेजचा वडापाव घेऊन गेला होता.
मुंबई: गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेला स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा याने सोमवारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला. 'Shut Up Ya Kunal' या आपल्या कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यासाठी कुणाल कामरा कृष्णकुंजवर आल्याचे समजते. कुणालने ट्विटरवर फोटो शेअर करून याबद्दल माहिती दिली. सध्या सोशल मीडियावर कुणाल कामराचा कृष्णकुंज निवासस्थानाबाहेरील फोटो व्हायरल होत आहे. यामध्ये कुणाल कामराच्या हातात एक पत्र दिसत आहे.
या पत्रात लिहले आहे की, मी तुमच्याबद्दल माहिती शोधली. तेव्हा तुम्हाला किर्ती कॉलेजचा वडापाव असतो, हे मला समजले. त्यामुळे मी तुम्हाला लाच द्यायला वडापाव आणला आहे. जेणेकरून तुम्ही माझ्या 'शटअप यार कुणाल' या कार्यक्रमासाठी याल, असे कुणाल कामराने या पत्रात म्हटले आहे.
पीएम मोदींच्या 'मै भी चौकीदार' कॅम्पेनची 'या' कॉमेडीयनने पुन्हा उडवली खिल्ली
काही दिवसांपूर्वी इंडिगो एअरलाईन्सच्या विमानात कुणाल कामराने पत्रकार अर्णब गोस्वामी यांच्याशी आक्षेपार्ह वर्तन केले होते. त्यामुळे इंडिगो एअरलाईन्स, एअर इंडिया, स्पाईस जेट या विमान कंपन्यांनी कुणाल कामरावर बंदी घातली होती. या सगळ्या वादामुळे सध्या कुणाल कामराचे नाव प्रचंड चर्चेत आहे.
दरम्यान, आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे कुणालच्या या कार्यक्रमाचे निमंत्रण स्वीकारणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ९ फेब्रुवारीला राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) बांगलादेशी आणि पाकिस्तानी घुसखोरांना देशातून हाकलवून लावण्याच्या मागणीसाठी मोर्चा काढणार आहे.