कुर्ला सब वे गर्दुल्यांना आंदण?
मुंबईकरांना अपघात टाळण्यासाठी अनेक सुविधा मिळाल्याची नोंद कागदोपत्री झाली. मात्र, परिस्थिती काहीतरी वेगळीच आहे. या सुविधांचा उपयोग गर्दुल्ले घेत आहेत.
प्रशांत अंकुशराव, झी मीडिया, मुंबई : मुंबईकरांना अपघात टाळण्यासाठी अनेक सुविधा मिळाल्याची नोंद कागदोपत्री झाली. मात्र, परिस्थिती काहीतरी वेगळीच आहे. या सुविधांचा उपयोग गर्दुल्ले घेत आहेत.
गर्दुल्यांचं ठिकाण
कुर्ल्यात पूर्व द्रुतगती मार्ग ओलांडण्यासाठी १५ वर्षांपूर्वी एक भुयारी मार्ग बनवण्यात आला. मात्र, आजपर्यंत या भुयारी मार्गाचं उद्घाटन झालंच नाही. हा भुयारी मार्ग पादचाऱ्यांसाठी खुलेच न केल्यानं सध्या मोठ्या प्रमाणात गर्द्दुल्यांचा वावर याठिकाणी पहायला मिळतोय. त्यामुळे हा भुयारी मार्ग गर्द्दुल्ले आणि दारुड्यांचा अड्डा बनत चाललाय.
स्थानिकांनीच घेतला निर्णय
गर्द्दुल्यांनी या सबवेला असलेल्या खिडक्यांचे लोखंडी गज कापून खिडक्यांमधून येण्या-जाण्याचा रस्ता तयार केला. महिलांना छेडणे आणि चाकूचा धाक दाखवत लुटमार करणे अशा अनेक घटना याठिकाणी गेल्या काही दिवसात समोर आल्यात. अखेर मनसे नेते नितीन नांदगावकर यांच्यासह स्थानिकांनी सर्व गर्दुल्यानं याठिकाणहून हटवलं.
गर्दुल्यांना चाप
भुयारी मार्गात गर्दुल्यांनी आपले अड्डे तयार केले होते. त्यांना रोखण्याची जवाबदारी प्रशासनाची आहे. चेंबूरमधील मनसे नेते नितिन नांदगावकरांनी दोन महिन्यांपूर्वी पोलिसांना पत्र देऊन गर्द्दुल्यांवर चाप बसवण्याची विनंती केली होती. मात्र, पोलिसांकडून काहीही कारवाई होत नसल्यानं त्यांनी जाऊन या गर्दुल्यांना हटवलं. जनतेचा पैसा खर्च करून जनतेसाठी निर्माण केलेली सुविधा १५ वर्षानंतरही जनतेपर्यंत न पोहचणे ही शोकांतिकाच आहे.