मुंबई: काल मध्यरात्रीपासून कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे भांडुपमध्ये दोन घरांवर संरक्षक भिंत कोसळल्याची घटना घडली आहे. येथील गावदेवी परिसरात सोमवारी रात्री हा प्रकार घडला. प्राथमिक माहितीनुसार, डोंगरालगत असणाऱ्या दोन घरांवर संरक्षक भिंतीचा काही भाग कोसळला. त्यामध्ये घरातील लोक गाडले गेल्याचे सांगितले जाते. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दल तातडीने घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाच्या जवानांकडून सध्या ढिगारा हटवण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. आतापर्यंत पाच जणांना ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात आले आहे. मात्र, मुसळधार पावसामुळे या बचावकार्यात अडथळे येत आहेत. दरम्यान, या घटनेत अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईत काल मध्यरात्रीपासूनच मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी झाडे कोसळल्याच्याही घटना घडल्या होत्या. तर पावसाचे पाणी तुंबल्यामुळे रस्ते आणि रेल्वे वाहतुकीचेही तीनतेरा वाजले होते. मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या अनेक फेऱ्या रद्द झाल्याने प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला. तिन्ही रेल्वेमार्गावर मिळून दिवसभरात लोकलच्या १८३ फेऱ्या रद्द झाल्या. अजूनदेखील या मार्गावरील गाड्या २० ते २५ मिनिटे उशिराने धावत आहेत. तर आज दिवसभरात लालबाग, दादर, हिंदमाता, कुर्ला, सायन, माटुंगा, चेंबूर, गोवंडी, किंग्ज सर्कल, धारावी, भांडूप, कांजूरमार्ग, वरळी, विक्रोळी आणि घाटकोपर परिसरातही पाणी साचल्याने नागरिकांची कोंडी झाली होती.


काही दिवसांपूर्वीच पुण्यातील कोंढवा येथील एका बडा तलाव मस्जिद परिसरातील आल्कन स्टायलस सोसायटीची संरक्षक भिंत कोसळून १५ जणांचा मृत्यू झाला होता. यामध्ये चार लहान मुलांचा समावेश होता. यानंतर पोलिसांनी 'अ‍ॅल्कॉन स्टाइलस' इमारतीचे भागीदार बिल्डर आणि नव्या इमारतीचे बांधकाम सुरू असणाऱ्या बिल्डरांवर गुन्हा दाखल केला होता.