शिवसेनेच्या बंडखोर आमदारांसाठी मुंबई विमानतळावर मोठा पोलीस बंदोबस्त
गोव्यामधून आज सर्व बंडखोर आमदार मुंबईत दाखल होणार आहेत.
मुंबई : शिवसेनेच्या बंडखोर आमदारांना नेण्यासाठी विशेष पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. आमदारांना घेण्यासाठी तीन बस तसेच काही खाजगी गाड्या देखील विमानतळाजवळ दाखल झाले आहेत. काही वेळातच सर्व आमदार मुंबईमध्ये दाखल होणार आहेत.
एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या 39 आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर राज्याच्या राजकारणात एकच गोंधळ उडाला होता. त्यानंतर महाविकासआघाडी अल्पमतात आलं आणि उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपद सोडावं लागलं. त्यानंतर आता एकनाथ शिंदे हे राज्याचे नवे मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीस हे नवे उपमुख्यमंत्री झाले आहेत.
एकनाथ शिंदे हे मुंबईत आले असले तर इतर सर्व आमदार गोव्यातच आहेत. गोव्यात देखील त्यांना विशेष सुरक्षा पुरवली गेली होती. त्याआधी हे सर्व आमदार गुवाहाटीमध्ये थांबले होते.
शिवसेनेच्या आमदारांनी बंडखोरी केल्यामुळे शिवसैनिकांनी त्यांच्या विरोधात आंदोलन केली होती. काही ठिकाणी त्यांच्या कार्यालयाची तोडफोड देखील करण्यात आली होती. आता हे सर्व आमदार मुंबईत दाखल होत असल्याने त्यांच्या सुरक्षेसाठी विशेष पोलीस तैनात केले गेले असून केंद्राची देखील विशेष सुरक्षा त्यांना दिली गेली आहे.