मागील सात वर्षात मुंबईत तब्बल `इतक्या` इमारती कोसळल्या
...याला जबाबदार कोण?
मुंबई : फोर्ट भागातील जीपीओ पोस्ट ऑफिससमोर, पाच मजली भानूशाली इमारतीचा काही भाग गुरुवारी दुपारच्या सुमारास कोसळला. या दुर्घटनेत 2 जणांचा मृत्यू झाला असून दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. इमारतीतील इतर रहिवाशांना बाहेर काढण्याचं काम युद्धपातळीवर सुरु आहे.
दरम्यान, मुंबईत दरवर्षी अशा अनेक इमारती कोसळल्याच्या, इमारतींचा काही भाग कोसळल्याच्या घटना घडत असतात. यासंबंधी कारवाई करण्याचं आश्वासनही देण्यात येतं. परंतु त्यानंतर दुर्लक्ष होत असल्याचंच अनेकदा समोर आलं आहे.
2013 ते 2019 या गेल्या सात वर्षांत मुंबईत तब्बल 3945 घरांचे, इमारतींचे भाग कोसळून 300 जणांचा मृत्यू झाला. तर 1146 जण जखमी झाल्याची माहिती आरटीआय कार्यकर्ते शकील शेख यांनी दिली आहे.
घरं, इमारती कोसळल्याची गेल्या सात वर्षातील आकडेवारी -
2013 - एकूण 531 घरं, इमारती, त्याचे भाग कोसळण्याच्या घटना घडल्या. या दुर्घटनेत एकूण 101 जणांचा बळी गेला. तर एकूण 183 लोक जखमी झाले.
2014 - या वर्षात एकूण 343 घरं, घरांचे, इमारतींचे भाग कोसळण्याच्या घटना घडून 21 लोकांचा मृत्यू झाला तर एकूण 100 लोक जखमी झाले.
2015 - 417 घरं, इमारतींच्या पडझडीच्या घटना घडल्या, यात एकूण 15 जण दगावले असून एकूण 120 लोक जखमी झाले होते.
2016 - 486 घरं, इमारती, भिंती कोसळल्या असून 24 जणांचा मृत्यू झाला. तर एकूण 172 लोक जखमी झाल्याची नोंद आहे.
2017 - या वर्षात 568 घरांचे, इमारतींचे भाग, इमारती कोसळल्याच्या दुर्घटना घडल्या. यात एकूण 66 जणांचा बळी गेला होता. तर 165 लोक जखमी झाले होते.
2018 - या वर्षात घर, इमारतींच्या तब्बल 619 दुर्घटना घडल्या होत्या. यात 15 जण दगावले होते. तर 79 लोक जखमी झाले होते.
2013 ते 2018 या सहा वर्षात 49 हजार 179 दुर्घटना घडून, 987 जणांचा मृत्यू झाला. तर 3066 जण जखमी झाले.
गेल्यावर्षी 2019 मध्ये पडझडीच्या 622 घटना घडून 51 जणांचा बळी गेला. तर 227 लोक जखमी झाले. त्याशिवाय 2019 या गेल्या वर्षात घरं पडणं, इमारत किंवा इमारतीचा भाग कोसळणं, शॉक लागणं, नाल्यात-समुद्रात वाहून जाणं, बुडणं अशा प्रकारच्या 9943 दुर्घटना घडल्या. यात 137 जणांचा मृत्यू झाला, तर 579 जण जखमी झाले.
दरम्यान, फोर्ट इमारत दुर्घटनेप्रकरणी संबंधितांवर सदोष मनुष्यबधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी केली आहे. प्रशासनाचा ऍक्शन प्लान तयार असतनाही अशा घटनांमध्ये निष्पापांचा बळी जात असताना आता याला जबाबदार कोण? हा प्रश्न अनुत्तरितच राहत आहे.