राकेश त्रिवेदी, झी मीडिया, मुंबई : सुशांतसिंह मृत्यूप्रकरणी कूपर हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी सीबीआयकडे काही धक्कादायक खुलासे केल्याची माहिती समोर येत आहे. सुशांतचं पोस्टमॉर्टम करणाऱ्या ५ डॉक्टरांची सीबीआयने चौकशी केली. या डॉक्टरांच्या चौकशीसाठी सीबीआयने काही महत्त्वाचे प्रश्न तयार केले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोरोनाचे रिपोर्ट येण्याआधीच सुशांतचं पोस्टमॉर्टम का केलं? असा सवाल सीबीआयने डॉक्टरांना विचारला. मुंबई पोलिसांच्या सांगण्यावरून आम्ही रात्री उशिरा सुशांतचं पोस्टमॉर्टम केल्याचं डॉक्टरांनी सीबीआयला सांगितल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 


सुशांतचे कोरोना रिपोर्ट येईपर्यंत पोस्टमॉर्टमसाठी थांबण्यात का आलं नाही? असा सवाल सीबीआयने विचारला, पण कोणत्याच डॉक्टरांना याचं समाधानकारक उत्तर देता आलं नसल्याचं सूत्रांनी सांगितलं. कोरोना रिपोर्टसाठी पोस्टमॉर्टम थांबवण्याची कोणतीही तरतूद नसल्याचं एका डॉक्टरने सीबीआयला सांगितल्याचीही माहिती आहे. 


१४ जूनला सुशांतसिंह त्याच्या वांद्र्याच्या घरात मृतावस्थेत सापडला. सुशांतच्या मृत्यूचा तपास सीबीआयकडे देण्याचा निर्णय सुप्रीम कोर्टाने दिला, यानंतर सीबीआयची टीम मुंबईमध्ये दाखल झाली. सीबीआयने काल सुशांतचा कूक नीरजची बरेच तास चौकशी केली. तर आता सुशांतचा मित्र सिद्धार्थ पिठानी सीबीआयच्या रडारवर आहे. 


१३ जूनच्या रात्री आणि १४ जूनला नेमकं काय घडलं? याबाबत सीबीआय सिद्धार्थला प्रश्न विचारणार आहे. १४ जूनला जेव्हा सुशांतचा मृत्यू झाल्याचं समजलं तेव्हा सिद्धार्थही सुशांतच्या वांद्र्याच्या घरी होता, त्यामुळे सीबीआयला सिद्धार्थची चौकशी करायची आहे. 


दरम्यान सुशांतच्या घरी क्राईम सीन रिक्रिएट करण्यासाठी आज सीबीआय अधिकारी कूक नीरज आणि सिद्धार्थला सुशांतच्या वांद्र्याच्या घरी घेऊन गेले.