Weather Update : हवामान खात्यानं वर्तवलेल्या अंदाजानुसार देशाची आर्थिक राजधानी असणाऱ्या मुंबईत थंडीचा मुक्काम वाढला आहे. देशातील उत्तरेकडे असणाऱ्या राज्यांमध्ये तापमान लक्षणीयरित्या घटल्यामुळं आणि तिथं सातत्यानं सुरु असणाऱ्या (Snowfall) बर्फवृष्टीमुळं पुढील तीन दिवस शहरात थंडीचा कडाका कायम असेल. दरम्यान, नुकताच सरलेला रविवार यंदाच्या हंगामातला सर्वात निचांकी दिवस ठरला. यावेळी 13.9 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद करण्यात आली. (Mumbai Climate Latest News)  


पुढचे पाच दिवस हवामान खराब... 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

येत्या पाच दिवसांमध्ये संपूर्ण देशात पुन्हा हवामान खराब राहणार असून, दोन दिवस कडाक्याची थंडी राहील, असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. आयएमडीच्या वृत्तानुसार राजस्थानात हवेची चक्रीय स्थिती निर्माण झाली असून, हिमालयात पश्चिमी चक्रवात तीव्र झाला आहे. ज्यामुळं देशात पुन्हा पाच दिवस दाट धुकं आणि बहुतांश भागात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. परिणामी, राज्यात 17 ते 20 जानेवारी या कालावधीत काही भागांत हलका पाऊस होऊ शकतो. देशातील अनेक भागांमध्ये असणाऱ्या पावसामुळं बऱ्याच भागांवर ढगाळ वातावरण असेल असंही हवामान खात्याकडून सांगण्यात आलं आहे. 


सर्वत्र धुक्याची चादर... 


राजधानी दिल्लीसमवेत संपूर्ण उत्तर भारतामध्ये सुद्धा नव्यानं शीतलहर सक्रीय होऊ शकते. या पार्श्वभूमीवर आयएमडीनं सदर राज्यांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. (Western Disturbance) अर्थात पश्चिमी विक्षोभामुळं यातून काही अंशी तापमानवाढ पाहायसा मिळू शकते. पण, त्यासाठी आधी सर्वांनाच कडाक्याच्या थंडीचा सामाना करावा लागणार आहे. दिल्लीचं किमान तापमान 3 अंशांवर जाणार असल्यामुळं सध्या या ठिकाणी आरोग्याची काळजी घेण्याचं आवाहन देण्यात येत आहे. 


हेसुद्धा वाचा : Crime : घाटकोपर येथील 50 फूट खोल दरीत पाच तास थरारक बचाव कार्य; शेवटी 'तो' वाचलाच नाही


 


फक्त थंडीच नव्हे, तर दिल्ली, पंजाब, हरियाणा, उत्तरप्रदेशला दाट धुक्याचाही इशारा देण्यात आला आहे. हिमाचलप्रदेश, जम्मू-काश्मीर आणि उत्तराखंडमध्येही दाट धुक्यासोबतच बहुतांश भागांमध्ये हिमवृष्टी होईल असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. दाट धुकं, हिमवृष्टी या साऱ्याचे परिणाम दैनंदिन जीवनावर होणार असून, रस्ते - रेल्वे आणि हवाई वाहतुक यामुळं विस्कळीत होणार आहे. थोडक्याच तुमचं कुणी उत्तरेकडील राज्यांतून येणार असेल किंवा त्या दिशेनं जाणार असेल तर त्यांच्या प्रवासाच काही अडथळे येऊ शकतात. त्यामुळं जादाचा वेळ हाताशी ठेवूनच प्रवास करा.  


काश्मीरमध्ये तापमान शुन्याच्याही खाली... 


काश्मीरमध्ये अनेक ठिकाणी तापमान शून्य अंशांहूनही कमी असल्याची नोंद करण्यात आली आहे. इथं श्रीनगरमध्ये शनिवारी रात्री तापमान उणे 0.06 इतकं होतं. तर, कुपवाडामध्ये तापमान 1.3 अंशावर स्थिरावलं होतं. काश्मीरच्या खोऱ्यामध्ये सध्या प्रचंड बर्फवृष्टी होत असल्याची माहिती समोर येत आहे.