Vidhan Parishad Election 2021 : रामदास कदम यांचा पत्ता कट, शिवसेनेकडून `हे` नाव निश्चित?
अनिल परब प्रकरणातील वादग्रस्त ऑडओ क्लिप रामदास कदम यांना भोवली?
मुंबई : महाराष्ट्र विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या 6 जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. या सहा जागांमध्ये मुंबईतील दोन जागांचा समावेश आहे. विधान परिषदेचे विद्यमान सदस्य रामदास कदम (Ramdas Kadam) हे शिवसेनेतून तर काँग्रेस पक्षाकडून भाई जगताप (Bhai Jagtap) यांच्या कार्यकाळ संपत आहे.
कथित ऑडिओ क्लिप भोवली
शिवसेनेकडून (Shiv Sena) रामदास कदम यांना पुन्हा उमेदवारी देण्याची शक्यता कमी आहे. भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. यासंदर्भातली माहिती सोमय्या यांना रामदास कदम यांनीच पुरवल्याचा आरोप करण्यात आला होता. यासंदर्भातील कथित ऑडिओक्लिपही व्हायरल झाली होती. रामदास कदम यांनी हे आरोप फेटाळले असेल तरी त्यांच्याबद्दल शिवसेनेमध्ये नाराजी असल्याचं बोललं जात आहे.
सुनील शिंदे यांचं नाव आघाडीवर
या जागेवर शिवसेनेकडून सचिन अहिर (Sachin Ahir), सुनील शिंदे (Sunil Shinde) आणि वरुण सरदेसाई (Varun Sardesai) यांच्या नावाची चर्चा आहे. पण विधान परिषदेसाठी सुनील शिंदे यांना उमेदवारी मिळणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय. सुनील शिंदे यांनी आदित्य ठाकरे यांच्यासाठी वरळी मतदार संघ सोडला होता.
2007 मध्ये मुंबई महापालिकेत निवडून आलेल्या सुनील शिंदे यांनी 2014 मध्ये सचिन अहिर यांचा पराभव करत विधानसभेत धडक मारली होती. याशिवाय बेस्ट समितीच्या अध्यक्षपदाचं कामही त्यांनी पाहिलं आहे.
सध्याचं मुंबई महापालिकेतील (BMC) नगरसेवकांचं संख्याबळ पाहता शिवसेना आणि भाजप प्रत्येकी एका जागेवर सहज विजयी होऊ शकते.