मुंबई : राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन (Maharashtra Legislative Winter Session) येत्या १४ आणि १५ डिसेंबर रोजी मुंबईत (Mumbai) घेण्यात येणार आहे. विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर आणि विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली विधीमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या विधानभवन येथे झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. मात्र या दोन दिवसांच्या अधिवेशनाला भाजपने विरोध दर्शवला आहे. सरकार पळ काढत आहे, अशी टीका केली.



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विधानसभा आणि विधानपरिषदेच्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, संसदीय कामकाज मंत्री ॲड. अनिल परब, मंत्री सर्वश्री जयंत पाटील, बाळासाहेब थोरात, एकनाथ शिंदे, विजय वडेट्टीवार, दिलीप वळसे-पाटील, सुभाष देसाई, अनिल देशमुख, सतेज पाटील, राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्यासह विधानपरिषद आणि विधानसभा सदस्य उपस्थित होते.


या बैठकीनंतर मुंबईतच विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन घेण्याचा निर्णय झाला असून १४ आणि १५ डिसेंबरला हे अधिवेशन होणार आहे.  राज्यात अनेक अतिवृष्टीपासून कोरोनापर्यंत अनेक मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्याची गरज आहे. त्यामुळे किमान दोन आठवडे अधिवेशन घ्यायला हवे, अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. मात्र कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत ही मागणी फेटाळण्यात आली. कोरोनामुळे दोन दिवसांचेच अधिवेशन घेत असल्याचे सरकारकडून सांगण्यात आले आहे.