COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गणेश कवडे, झी मीडिया, मुंबई : मुंबईतील अंधेरीच्या मानवी वस्तीत पुन्हा एकदा बिबट्या घुसल्याची घटना घडली. अंधेरीच्या मरोळ भागातील रहिवाशी वुड लँड क्रिस्ट या इमारतीत बिबट्या घुसल्याने परिसरात एकच घबराहट पसरली. इमारतीच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात हा बिबट्या कैद झाला. मरोळ इथल्या वुड लँड क्रिस्ट इमारतीत हा बिबट्या शिरला होता. 


अंधेरीतील वुडलँड क्रिस्ट या इमारतीमधील नागरिकांसाठी सोमवारची सकाळ थरारक होती. सकाळी नऊच्या सुमारास हा बिबट्या या इमारतीत घुसला. बिबट्या इमारतीत शिरल्याची दृष्यं सीसीटीव्ही दिसताच इथं राहणाऱ्या नागरिकांमध्ये दहशतीचं वातावरण पसरलं. तब्बल साडेचार तासांच्या प्रयत्नानंतर बिबट्याला जेरबंद करण्यात यश आल्याचे पशूवैद्यकीय अधिकारी डॉ. शैलेश पेठे यांनी सांगितले. 


संजय गांधी उद्यान, आरे कॉलनी, ठाणे, मुलुंड परिसर हा जंगल परिसर आहे. याच परिसरात मोठया प्रमाणात विकासकामं सुरू आहेत. याचा परिणाम अर्थात वन्यप्राण्यांवर होत असल्याची ओरड अनेक प्राणीमित्रांकडून होतेय. या रहिवासी इमारतीत घुसलेल्या बिबट्याने कुणालाही त्रास दिला नाही, मात्र तो स्वतः भेदरला होता असं स्थानिक सांगतात. बिबट्या मानवी वस्तीत घुसण्यासाठी माणूसच जबाबदार असल्याचं वन्यजीव अभ्यासक सांगतात. त्यामुळे बिबटे मानवी वस्तीजवळ येणार नाहीत यासाठी आताच उपाययोजना करण्याची गरज आहे. अन्यथा शहरी भागातही बिबट्यांच्या हल्ल्यांच्या घटना वाढतच जातील.