Viral Video: मुंबईतील सोसायटीच्या आवारात फिरतोय बिबट्या, `या` परिसरात रात्रीचे चुकूनही फिरकू नका
Leopard Video Viral: मुंबईतील एका सोसायटीच्या आवारात बिबट्या फिरत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
Mumbai Leopard Video Viral: मुंबई आणि गर्दी हे तर समीकरणच झाले आहे. शहर व उपनगरात दाट लोकवस्ती आहे. तर, शहरातील लोकसंख्याही झपाट्याने वाढत आहे. मुंबई शहराच्या मधोमध एक जंगल आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आणि आरे नजीकच्या परिसरात मोठ्या प्रमाणात वन्य प्राण्यांचा वावर असतो. असाच एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. मुंबईच्या एका सोसायटीच्या आवारात बिबट्या फिरताना दिसतोय. यामुळं परिसरातील प्रवाशांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.
जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोड जवळील ओबेरॉय स्पेंडर या सोसायटीच्या आवारात बिबट्या फिरताना आढला आहे. सोसायटीच्या संरक्षक भितींनजीकच बिबट्या असल्याचे सीसीटीव्हीत दिसले आहे. यामुळं सोसायटीतील रहिवाशांसोबतच परिसरातील नागरिकांमध्येही भितीचे वातावरण पसरले आहे. रात्रीच्या वेळेत घराबाहेर पडणेही मुश्कील झाले आहे.
ओबेरॉय स्प्लेंडर ही सोसायटी आरे कॉलनीच्याजवळ आहे. जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोडवरच ही इमारत आहे. या सोसायटीच्या बाउंड्री वॉलच्या मागे बिबट्या फिरताना व्हिडिओत दिसत आहे. 7 फेब्रुवारी रोजी कॅमेऱ्यात ही घटना कैद झाली आहे. निवासी परिसरात बिबट्या फिरताना दिसल्याने एकच खळबळ उडाली आहे. याबाबत वनविभागाला माहिती देण्यात आली आहे. तसंच, रहिवाशांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहनही करण्यात येत आहे.
रहिवाशांना घाबरुन जाऊ नये फक्त सावधानी बाळगा. वनविभाग या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. तसंच, सकाळी आणि रात्रीही अधिकारी या परिसरात गस्त घालत आहेत. तसंच, पुन्हा बिबट्याचे दर्शन घडले तर वनविभागाच्या 1926 या टोल फ्री हेल्पलाइन क्रमांकावर फोन करुन लगेचच माहिती द्यावी, असं अवाहन वन विभागाने केलं आहे.
बिबट्या आमच्या सोसायटीच्या आवाराबाहेर फिरतोय हे खूपच भीतीदायक आहे. यामुळं धोकादायक स्थिती निर्माण होऊ शकते. आम्ही वन विभाग अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहोत, अशी माहिती सोसायटीतील रहिवाशानी दिली आहे.
सोसायटीच्या आवारात बिबट्या फिरत असल्यास रहिवाशांना काय काळजी घ्यावी, याची माहिती वन विभाग अधिकाऱ्यांनी दिली आहे. रहिवाशांना रात्रीच्या वेळी एकटे फिरु नये. सोसयटीत प्रकाश चांगला असूद्यात. लहान मुलं आणि पाळीव प्राण्यांना एकटं सोडू नका. तसंच, सुरक्षा रक्षकांना त्यांच्या दालनातच बसू द्यात. तसंच, रात्रीच्या वेळी त्यांच्या हातात टॉर्च लाइट असूद्यात.
दरम्यान, पुणे येथे मृत बिबट्याची नखे आणि पंजा कापून नेल्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणी तीन अल्पवयीन मुलांवर वनविभागाने गुन्हा दाखल केला. एका अल्पवयीन मुलाने वडिलांच्या व सोबतच्या २ अल्पवयीन मुलांच्या मदतीने मृत बिबट्याचे ३ नखे व पायाचा पंजा व त्याचे १ नख अशी एकूण ४ नखे कोयता व सुरीच्या साहाय्याने कापून लपवून ठेवल्याचे सांगितले. तसेच बिबटच्या नखाचे गळ्यातील लॉकेट बनविण्याचे उद्देशाने आकर्षणापोटी गुन्हा केल्याचे सांगितले.