एलआयसीकडून महाराष्ट्रावर अन्याय; हिंदी भाषेची परीक्षा बंधनकारक
महाराष्ट्रालाच हिंदी भाषेची परीक्षा बंधनकारक का?
मुंबई: भारतीय आयुर्विमा महामंडळाकडून (एलआयसी) लवकरच 'असिस्टंट क्लार्क' या पदासाठी मेगाभरती करण्यात येणार आहे. मात्र, या प्रक्रियेत एलआयसीकडून महाराष्ट्रातील उमेदवारांवर अन्याय होत असल्याची बाब समोर आली आहे.
या भरती पक्रियेसाठी एलआयसीकडून परीक्षा घेण्यात येईल. मात्र, यासाठी महाराष्ट्रातील मुलांना हिंदी भाषेची परीक्षा बंधनकारक करण्यात आली आहे. परंतु, दक्षिण,पूर्व भारत, पश्चिम बंगाल या राज्यांना हिंदी भाषेच्या परीक्षेतून सूट देण्यात आली आहे. त्यामुळे महाराष्ट्रालाच हिंदी भाषेची परीक्षा बंधनकारक का, असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.
हिंदी भाषेमुळे महाराष्ट्रातील उमेदवार परीक्षेत मागे पडतील. त्यामुळे हा निर्णय रद्द करण्यात यावा, अशी मागणी एलआयसी कर्मचारी संघटनांकडून करण्यात आली.
'एलआयसी'कडून २४ वर्षांनंतर पदभरती केली जाणार आहे. त्यानुसार, 'असिस्टंट क्लार्क' पदासाठी पूर्व परीक्षा व मुख्य परीक्षा घेतली जाईल. यासाठी उमेदवार पदवीधर असणे आवश्यक असून त्याचे वय १८ ते ३० दरम्यान असावे. मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांसाठी वयाची अट शिथील करण्यात आली आहे.
पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा असे परीक्षेचे स्वरुप असेल. पूर्व परीक्षेसाठी रिझनिंग अॅबिलिटी, न्यूमेरिकल अॅबिलिटी आणि इंग्रजी हे तीन विषय असून, ही परीक्षा ऑनलाइन होणार आहे. बहुपर्यायी प्रश्न आणि उत्तरे असे परीक्षेचे स्वरूप असेल.
या परीक्षेसाठी संपूर्ण देशात परीक्षा केंद्रे असून, महाराष्ट्रामध्ये मुंबई, पुणे, ठाणे, नागपूर, औरंगाबाद, कोल्हापूर, नाशिक, रत्नागिरी, सातारा, सोलापूर, पणजी आदी ठिकाणी परीक्षा होणार आहे. त्यासाठी इच्छुकांना १ ऑक्टोबर २०१९ पर्यंत www.licindia.in/careers या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज करता येणार आहेत.