साहित्यिक लक्ष्मण गायकवाड यांचे उपोषण यशस्वी मध्यस्थीनंतर मागे
साहित्यिक लक्ष्मण गायकवाड (Laxman Gaikwad) यांनी आपले उपोषण (fast back) यशस्वी मध्यस्थीनंतर मागे घेतले आहे.
मुंबई : साहित्यिक लक्ष्मण गायकवाड (Laxman Gaikwad) यांनी आपले उपोषण (fast back) यशस्वी मध्यस्थीनंतर मागे घेतले आहे. लक्ष्मण गायकवाड यांच्या ताब्यात असलेल्या चित्रनगरीतील उपाहारगृहाच्या जागेसंदर्भात नियमांनुसार निर्णय घेवून उपाहारगृहातील वीजपुरवठा आणि पाणीपुरवठा तात्काळ सुरु करावा, असे निर्देश उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. (Literary Laxman Gaikwad's fast back after successful mediation by Deputy Speaker Neelam Gorhe)
उपाहारगृह सुरू करण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून निर्णय घेण्यात येईल असेही उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले. व्यवस्थापकीय संचालक श्रीमती मनीषा वर्मा यांनी डॉ. गोऱ्हे यांनी दिलेल्या निर्देशाचे पालन करत तात्काळ वीज व पाणी पुरवठा सुरळीत केला. गायकवाड यांनी चर्चेवर समाधान व्यक्त केले. तसेच गायकवाड यांनी सपत्नीक सुरू असलेले उपोषण मागे घेतले असून डॉ. गोऱ्हे यांचे आभार मानले. लक्ष्मण गायकवाड हे साहित्यिक असून महाराष्ट्र शासनाने त्यांना महाराष्ट्र गौरव पुरस्काराने सन्मानित केले आहे.
लक्ष्मण गायकवाड यांच्या ताब्यात असलेल्या चित्रनगरीतील जागेसंदर्भात बैठक दूरदृश्य प्रणालीद्वारे विधानभवन येथे झाली. यावेळी चित्रनगरीच्या व्यवस्थापकीय संचालक मनिषा वर्मा, साहित्यिक अर्जुन डांगळे, सक्षम अधिकारी तेजस समेळ तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.
1995 पासून शासनाने गायकवाड यांच्या सन्मानार्थ चित्रनगरीत उपाहारगृहासाठी जागा दिली होती. यासंदर्भात 2017 नुसार भाडे देण्यास तयार असून सध्या 1 लाख 50 हजार भाडे देत आहे. सध्या उपाहारगृह बंद असल्याने कामगार उपाशी आहेत. 2017 चा करार मान्य असून नियमानुसार वीजपुरवठा आणि पाणीपुरवठा सुरु करुन शासनाने उपाहारगृह सुरु करण्यास परवानगी द्यावी, असे गायकवाड यांनी बैठकीत सांगितले. भाडे थकबाकीबाबत नोटीसा देवून सुद्धा नियमांची पूर्तता न केल्याने उपाहारगृह बंद करुन वीजपुरवठा-पाणीपुरवठा खंडीत करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
उपसभापती डॉ.गोऱ्हे म्हणाल्या, या जागेबाबत कायदेशीर आणि योग्य निर्णय घेऊन एका साहित्यिकाचे सनदशीर मार्गाने पुनर्वसन करण्यात अडचणी निर्माण होऊ नयेत.गायकवाड यांना न्याय देण्यासाठी नियमानुसार योग्य कार्यवाही करण्यात यावी. तसेच खंडीत करण्यात आलेला वीजपुरवठा-पाणीपुरवठा तात्काळ सुरु करावा. उपहारगृह सुरु करण्यासंदर्भात मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करुन निर्णय घेण्यात येईल आणि गायकवाड यांना न्याय देण्यात येईल. नियमानुसार त्यांची मागणी पूर्ण करण्याची कार्यवाही तात्काळ करावी, असे निर्देश डॉ.गोऱ्हे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना यावेळी दिले.
उपाहारगृह सुरु झाल्यानंतर शिवभोजन थाळी सुरु करण्याबाबत आणि पॉवर ऑफ अटर्नी रद्द करण्याबाबत डॉ.गोऱ्हे यांनी श्री.गायकवाड यांना सांगितले. यावर गायकवाड यांनी शिवभोजन थाळी सुरु करण्याबाबत आणि पॉवर ऑफ अटर्नी रद्द करण्याबाबत मान्यता देऊन वीजपुरवठा-पाणीपुरवठा सुरु केल्यास उपोषण थांबविण्याचे त्यांनी मान्य केले. त्यानुसार गायकवाड यांनी उपोषण मागे घेतले.