प्रथमेश तावडे, झी मीडिया, वसई : नालासोपाऱ्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. 8 वर्षांचा एक मुलगा घरात टीव्ही बघत असताना अचानक टीव्हीचा स्फोट झाल्याची घटना घडली


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 नालासोपारा पूर्वेच्या विजय नगर इथली ही घटना आहे. इथल्या शिवधाम इमारतीत गोविंद विश्वकर्मा हे आपल्य कुटुंबासह भाड्याने राहातात. आज दुपारी गोविंद यांची पत्नी मुलाला घरात लॉक करुन काही कामासाठी बाहेर गेल्या होत्या. घरात एकटाच असलेला मुलगा टीव्ही बघत असताना अचानक टीव्हीतून धूर येऊ लागला.


शॉर्ट शर्किटमुळे टीव्हीचा स्फोट झाला आणि घरात सर्वत्र धूरच धूर पसरला. मुलाने प्रसंगावधान दाखवत घराची खिडकी उघडून आरडा ओरडा सुरु केला. मुलाचा आरडा ओरडा ऐकून परिसरातील रहविशांनी तात्काळ धाव घेत घराचं कुलूप तोडलं आणि मुलाची सुटका केली. 


या घटनेत टीव्ही आणि घरातील वायरिंगचे मोठे नुकसान झालं आहे. पोलिस व अग्निशमन विभागाने घटनास्थळी पोहचून या घटनेची नोंद केली असून अधिक तपास केला जात आहे..