मुंबई: शिवसेना आणि भाजपने राज्यात लवकर लवकर सरकार स्थापन करावे. आम्ही त्याची वाट पाहत आहोत, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केले. ते बुधवारी मुंबईतील पत्रकारपरिषदेत केले. यावेळी त्यांनी जनतेने काँग्रेस आणि राष्ट्रवादीला सक्षम विरोधी पक्ष होण्याची जबाबदारी दिल्याचे सांगत शिवसेनेला सत्तास्थापनेसाठी पाठिंबा देण्याची शक्यता तुर्तास फेटाळून लावली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तसेच आजच्या भेटीवेळी संजय राऊत शिवसेनेकडून कोणताही प्रस्ताव घेऊन आले नव्हते. ते नेहमीप्रमाणे चर्चा करायला आले होते, असेही पवारांनी सांगितले. शरद पवारांनी घेतलेल्या या अलिप्तपणाच्या भूमिकेमुळे राज्यातील सत्तास्थापनेबाबतचा संभ्रम अजूनही कायम आहे. 



या संपूर्ण पत्रकारपरिषदेत शरद पवार यांनी गरज पडल्यास शिवसेनेला पाठिंबा देणार का, याविषयी फार काही बोलणे टाळले. शिवसेना आणि भाजप २५ वर्षांपासून एकत्र काम करत आहेत. त्यामुळे अगदी शेवटच्या क्षणीही त्यांच्या युती होईल, असा विश्वास आपल्याला वाटतो. राज्यात घटनात्मक पेच निर्माण होऊ नये, एवढीच आपली अपेक्षा असल्याचे शरद पवार यांनी म्हटले. 


महाराष्ट्रात सत्ता स्थापनेचा जो पेच निर्माण झाला आहे त्यावर शरद पवार काय बोलणार याकडे सगळ्या राज्याचे लक्ष लागले होते. मात्र, आपल्याकडे कोणीही प्रस्ताव घेऊन आलेले नाही. तसेच संख्याबळ असते तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीनेही सरकार स्थापन केले असते, असेही पवारांनी सांगितले. 


दरम्यान, आज सकाळपासून मुंबईत सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. भाजपकडून कोअर टीमकडून कालच शिवसेनेला नव्याने चर्चा करण्याचा प्रस्ताव दिला होता. मात्र, सरकार देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वाखालीच स्थापन होईल, असे भाजप नेत्यांनी स्पष्ट केले होते. यानंतर शिवसेना नेते संजय राऊत यांनी नव्याने चर्चा करण्याचा प्रस्ताव धुडकावून लावला होता. मात्र, शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस विरोधी पक्षातच बसेल, असे स्प्ष्ट केल्यानंतर शिवसेनेकडून मातोश्रीवर वरिष्ठ नेत्यांना बैठकीसाठी पाचारण करण्यात आले आहे. त्यामुळे आजच्या दिवसात काय घडणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.