मुंबई : नव्या महाविकासआघाडी सरकारमध्ये काँग्रेसच्या वाट्याला उपमुख्यमंत्रिपद येणाराय... सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बाळासाहेब थोरात यांच्या गळ्यात उपमुख्यमंत्रिपदाची माळ पडणाराय. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री, तर बाळासाहेब थोरात आणि राष्ट्रवादीचे अजित पवार उपमुख्यमंत्री असं सरकार सत्तेवर येण्याची शक्यता आहे. पण काँग्रेसमध्ये उपमुख्यमंत्रिपदावरुन जोरदार लॉबिंग सुरू झालंय. प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण या दोन्ही गटांकडून जोरदार लॉबिंग सुरू आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उपमुख्यमंत्रिपदासाठी प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांची नावं सध्या चर्चेत असून दोन्ही गटांकडून जोरदार रस्सीखेच सुरू असल्याचं समजतं आहे. थोरातांचं नाव आघाडीवर असल्याचं मानलं जात असून त्यामुळे अशोक चव्हाण गटाचे आमदार आक्रमक झाल्याची चर्चा आहे.


महाविकासआघाडीच्या बैठकीआधी काँग्रेस विधीमंडळ पक्षाची आज दुपारी १ वाजता बैठक होणार आहे. या बैठकीत विधीमंडळ पक्षाचा नेता निवडला जाईल. सर्व आमदारांना हजर राहण्याचे आदेश देण्यात आलेत. विधीमंडळ पक्षनेते पदासाठी बाळासाहेब थोरात आणि अशोक चव्हाण यांचं नाव चर्चेत आहे. दिल्लीवरून येत असलेले निरीक्षक पक्षाच्या आमदारांची मतं जाणून घेऊन त्याचा अहवाल दिल्लीला कळवतील. 


अशोक चव्हाण आणि पृथ्वीराज चव्हाण यांनी महाराष्ट्राच्य़ा मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी याआधी निभावली आहे. पण या दोघांकडे उपमुख्यमंत्रीपद जाण्याची शक्यता कमी दिसते आहे. उपमुख्यमंत्रीपदासोबतच बाळासाहेब थोरात यांना महसूलमंत्रीपद देखील मिळण्याची शक्यता आहे.


राज्यातल्या सत्तास्थापनेच्या दृष्टीने काँग्रेसची बैठक मुंबईत होणार आहे. या बैठकीला काँग्रेसकडून के.सी. वेणूगोपाल, मल्लिकार्जुन खरगे आणि अहमद पटेल उपस्थित राहणार आहेत. आज दुपारी २ वाजता महाविकास आघाडीची अंतिम बैठक होण्याची शक्यता आहे. त्यानंतर महाविकास आघाडीवर शिक्कामोर्तब होणार आहे. नवे सरकार स्थापन करण्याची प्रक्रिया आजच सुरू करण्यात येण्याची चिन्ह आहेत. 


काँग्रेसच्या वाट्याला 9 कॅबिनेटमंत्रीपदं, 3 राज्यमंत्रीपदं आणि उपमुख्यमंत्रीपद येण्याची शक्यता आहे. तसेच २५ महामंडळं देखील काँग्रेसच्या वाट्याला येणार आहेत. त्यामुळे आता कोणाच्या वाट्याला मंत्रीपदं येणार याबाबत उत्सूकता आहे. पण या निमित्ताने काँग्रेसमध्ये मंत्रीपदासाठी लॉबिंग सुरु झाल्य़ाची चर्चा आहे.