लोकलवरील दगडफेकीत तरुणीचा ओठ फाटला आणि दोन दातही तुटले
लोकल सव्वा नऊच्या सुमारास मुंब्रा खाडी पुलाजवळ येताच अचानक मागच्या लेडीज फर्स्ट क्लास डब्यावर दगड भिरकवण्यात आले.
मुंबई : लोकलवरील दगडफेकीत तरुणी जखमी झाल्याची घटना काल रात्री मुंब्रा स्थानकाजवळ घडली. कांचन हाटले असं या तरुणीचं नाव असून तिच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. दिवा पश्चिमेला राहणारी कांचन मुलुंडच्या एका खासगी कंपनीत काम करते. काल रात्री ऑफिसमधून निघाल्यावर ठाण्याहून नऊ वाजताची डोंबिवली स्लो लोकल तिने पकडली. ही लोकल सव्वा नऊच्या सुमारास मुंब्रा खाडी पुलाजवळ येताच अचानक मागच्या लेडीज फर्स्ट क्लास डब्यावर दगड भिरकवण्यात आले. या घटनेत कांचन आणि अन्य एक तरुणी जखमी झाली.
दोन दात तुटले
या प्रकारामुळे लोकलमध्ये एकच खळबळ माजली. यानंतर कांचनला आधी केडीएमसीच्या शास्त्रीनगर रुग्णालयात आणि तिथून खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
कांचनच्या चेहऱ्यावर दगड जोरात आपटल्याने तिचा ओठ फाटला असून दोन दात तुटले आहेत.
तिच्यावर रात्रीच तातडीची शस्त्रक्रियाही करण्यात आल्याची माहिती नातेवाईकांनी दिली आहे.
या सगळ्या प्रकारानंतर लोकलवर दगडं मारणाऱ्यांवर कडक कारवाईची मागणी कांचनच्या आईने केली आहे.