सर्वसामान्यांसाठी लोकल सेवा सुरू, निर्णयाचं मुंबईकरांकडून स्वागत
1 फेब्रुवारीपासून सर्वांसाठी लोकल सुरु
मुंबई : 1 फेब्रुवारीपासून सर्वांसाठी लोकल सुरु होते आहे. तब्बल 310 दिवस बंद असलेली मुंबईकरांची लाईफलाईन पुन्हा एकदा सुरू होणारे. येत्या सोमवारपासून म्हणजे 1 फेब्रुवारीपासून सर्वांसाठी लोकल सुरू करण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. त्यामुळं सामान्य मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला. मात्र गर्दी टाळण्यासाठी सुरूवातीला काही विशिष्ट वेळांमध्येच सामान्य प्रवाशांना लोकल प्रवासाची परवानगी देण्यात आली आहे.
सर्वसामान्य लोकांसाठी वेळ
पहिली लोकल ते सकाळी ७ वाजेपपर्यंत
दुपारी १२ ते 4 वाजेपर्यंत
रात्री 9 ते शेवटच्या लोकलपर्यंत
बाकीच्या वेळेत याआधी परवानगी दिलेल्या विशिष्ट प्रवर्गातील प्रवाशांनाच लोकल उपलब्ध असणार आहे.
सर्वसामान्यांसाठी लोकल सेवा सुरू करण्याच्या निर्णयाचं मुंबईकरांनी स्वागत केलं आहे. तर विशिष्ट वेळेतच लोकल प्रवास करण्याचं बंधन घालण्यात आल्यानं विरोधकांनी सरकारवर टीका केली आहे.
लॉकडाऊन संपल्यानंतर आता मुंबईकरांची लाईफलाईन असलेली लाडकी लोकल पुन्हा सुरू होते आहे. पण आता फलाट आणि पायदान यातल्या अंतरावर लक्ष ठेवतानाच कोरोना अजून संपलेला नाही, याची जाणीव लोकल प्रवाशांनी ठेवण्याची गरज आहे.