LOCKDOWN 2.0 | राज्याचे मुख्यमंत्री जनतेशी संवाद साधणार, लॉकडाऊनशिवाय आरोग्य सेवेचं मोठं आव्हान
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज रात्री साडेआठला राज्याच्या जनतेशी संवाद साधणार आहेत. राज्यासमोर
मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज रात्री साडेआठला राज्याच्या जनतेशी संवाद साधणार आहेत. राज्यासमोर कोरोनाची साथ हे सर्वात मोठं संकट सध्या आहे. या संकटाशी सामना करण्यासाठी राज्याकडून केल्या जाणाऱ्या उपाय योजनांविषयी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बोलू शकतात अशी शक्यता आहे. तर सर्वात मोठी शक्यता आहे, राज्यात लॉकडाऊनची घोषणा होण्याविषयी. राज्यात लॉकडाऊनची घोषणा झाली तर लॉकडाऊन कधी होईल. लॉकडाऊन विषयी नेमक्या गाईडलाईन्स काय असतील. याविषयी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे बोलतील अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. कारण प्रशासकीय स्तरावर लॉकडाऊनची मोठ्या प्रमाणात तयारी आणि आराखडा बनवला जात असल्याचं सांगण्यात येत आहे.
दरम्यान झी २४ तासच्या सुत्रांनी १५ एप्रिल ते ३० एप्रिलपर्यत राज्यात लॉकडाऊन लावला जाणार असल्याची शक्यता वर्तवली आहे.
राज्याला लॉकडाऊनशिवाय पर्याय नाही हे राज्यातील काही भागात कोरोनामुळे उडालेल्या हाहाकारावरुन दिसून येत आहे. फक्त लॉकडाऊनच नाही, तर कोरोना रुग्णांना उपचारासाठी मिळत नसलेले बेड, ऑक्सिजनचा पुरवठा, रेमडेसिवीर सारखी इंजेक्शन्स, आरटीपीसीआर सारख्या चाचण्यांना होत असलेला विलंब यावरही मुख्यमंत्री बोलतील अशी शक्यता आहे.
कारण राज्यात रुग्णांना बेड, अपूर्ण ऑक्सिजनचा पुरवठा, रेमडेसिवीरचे इंजेक्शन्स, रेमडेसिवीरचा काळाबाजार, आरटीपीसीआर चाचण्यांना होत असलेला उशीर, चाचण्यांच्या नावाने उकळले जाणारे भरमसाठ पैसे यामुळे आरोग्य व्यवस्थेवर टीका होत आहे. यावर सरकार तात्काळ काय उपाय योजना करणार आहे, याकडेही राज्याचं लक्ष लागून आहे.